तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया ||


 

स्थैर्य, दि.२६: आज देवप्रबोधिनी कार्तिकी एकादशी ! भगवान श्रीपंढरीनाथांची कार्तिकी वारी !!

भूवैकुंठ पंढरी, भगवान श्रीपांडुरंग आणि त्यांचे अलौकिक भक्त ; सारेच अत्यंत विलक्षण आहेत, इतर कशाशीच यांची तुलना होऊ शकत नाही. पंढरीत रंगणाऱ्या आषाढी व कार्तिकी या दोन एकादशांच्या अपूर्व सोहळ्याची देखील अन्य कशाशीच तुलना होऊ शकत नाही, तो प्रत्यक्ष अनुभवण्याचाच गूढरम्य विषय आहे !

भूवैकुंठ पंढरीचे माहात्म्य अतिशय समर्पक शब्दांत सांगताना भक्तश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात,

अवघींच तीर्थें घडलीं एक वेळां ।

चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥

अवघींच पापें गेलीं दिगंतरी ।

वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥

अवघिया संता एक वेळां भेटी ।

पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥

तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।

विठ्ठलचि एक देखिलिया ॥४॥

“जगातील यच्चयावत् सर्व तीर्थांच्या दर्शनाचे पुण्य भूवैकुंठ पंढरीतील परमपवित्र चंद्रभागा नदीच्या केवळ एका वेळच्या दर्शनानेच प्राप्त होते. भूवैकुंठ पंढरपुराचे मनोभावे दर्शन झाल्याबरोबर अवघी पापे दशदिशांना पळून जातात. भक्तश्रेष्ठ पुंडलिकांचे दर्शन हे सर्व संतांच्या दर्शनासारखेच आहे. श्री तुकोबाराय म्हणतात, खरोखर सांगतो, जन्माला आल्याचे सार्थक हे एकमात्र भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीविठ्ठलांचे दर्शन झाल्यानेच केवळ होते !”

पंढरीच्या या सावळ्या सगुण परब्रह्माचे रूप इतके गोड आहे की बस ! अहो, साक्षात् भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउली जेथे त्या अपूर्व-मनोहर रूपमाधुरीने वेडावले, तेथे आपला काय हो पाड ? युगानुयुगे हेच ते गोजिरे साजिरे गोवळे परब्रह्म नेणो कित्येकांना जन्माचा वेध लावून उभे आहे. या सुकुमार मदनाच्या पुतळ्याचे प्रेम आल्यागेल्याला असे झडपते की काय सांगायचे. पंढरीच्या या सावळ्याचे प्रेम जबरी भूतच आहे. या दिव्य प्रेमाने एकदा झपाटले की मग कोणताही उपाय करा, काही केल्या ते सोडतच नाही… !!

आणि ज्याला ते झपाटते त्याला तरी कुठे सुटायचे असते म्हणा त्यातून. त्या प्रेमात आपादमस्तक बुडून जाण्यात जी गोडी, जो आनंद आहे तो अन्य कश्शातच नाही. म्हणूनच तर श्री तुकोबा म्हणतात, *पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥* पंढरीत नामाचा कल्लोळ आहे नि प्रेमाचा सुकाळ आहे. आणि त्याच दैवी प्रेमाचे साकार रूप विटेवरही उभे आहे, लुटाल तितके लुटा, कधीच काही कमी नाही होणार त्यात. तुम्हां आम्हां भोळ्या भाविकांसाठीच तर ही अखंडित सुखमिराशी आहे ना !

हे असे एकमात्र तीर्थ आहे जिथे कळसाच्या दर्शनानेही मोक्ष लाभतो. श्री तुकोबाराय गर्जून सांगतात, *तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥* एरवी शेवटच्या क्षणापर्यंत पाठ न सोडणारा आपला अहंकार, पंढरीत येऊन मंदिराच्या कळसाचे दुरून जरी दर्शन झाले तरी तत्काळ नष्ट होतो, त्याचे नावच राहात नाही. सर्वत्र एक विठ्ठलच दिसू लागल्यावर आपला अहंकार कुठे शिल्लक राहणार ?

पंढरीत नाम आहे, रूप आहे, भाव आहे आणि प्रेम आहे. या चतुर्विध संगमात भक्त एकदा का न्हाला की त्याचे काम फत्ते ! पंढरीचे सगळेच अलौकिक आहे, किती आणि काय बोलू त्याबद्दल ? शब्दांना तिथे काहीच किंमत नाही. अनुभवच घ्यावा लागतो ज्याचा त्याने. पण त्यासाठी आधी पंढरीचे उघडे सगुणब्रह्मच पूर्णत्वाने वोळले पाहिजे. त्या प्रेममय सगुणमेघश्याम लावण्यसुंदराने आपल्या प्रेमपिशाचाची बाधा करवायला हवी आपल्याला. ते सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे.

ह्या अपूर्व-मनोहर प्रेमबाधेची लागण व्हावी आणि ती आजन्म कायमचीच टिकून राहावी, यासाठीच आपण सर्वांनी त्या त्रिभुवनगुरु परमानंदकंद भगवान श्रीविठ्ठलांच्या अखंड नामगजरात आजची ही कार्तिकी हरिदिनी साजरी करू या आणि आनंदाचा धणीवरी उपभोग घेऊ या ! आजच्या प्रबोधिनीच्या पावन मुहूर्तावर आमच्याही चित्ताला तोच दिव्य प्रेमबोध होवो, हीच श्रीविठ्ठलस्वरूप श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना !

भगवान श्रीपंढरीरायांचे प्रेमभांडारी श्रीसंत नामदेवराय महाराजांच्या चरणीं जयंतीनिमित्त सादर दंडवत !

भगवान श्रीपांडुरंगांचे विलक्षण योगमय स्वरूप आणि ‘प्रबोधिनी’ शब्दाचा विशेष अर्थ यांचे विवेचन करणारे कार्तिकी एकादशीचे चिंतन खालील लिंकवरील लेखात आहे, तेही आवर्जून वाचावे.

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो

https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post.html?m=1

पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ।

भगवान श्रीपंढरीनाथ महाराज की जय ।

लेखक – रोहन विजय उपळेकर

*भ्रमणभाष – 8888904481*


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!