स्थैर्य, सातारा दि.२६: संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्ण शोध मोहिम अभियान 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, ही मोहिम प्रभावीपणे राबवून या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जावून आरोग्य तपासणी करणार आहेत. नागरिकांनी तपासणी करुन आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठ रुग्ण शोध मोहिम अभियानाबाबत जिल्हा सन्मय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘संविधान दिन’ साजरा
संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठ रुग्ण शोध मोहिम शहरी भागावर जास्तीचे लक्ष केंद्रीत करावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, या मोहिमेंतर्गत प्रत्येक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्व्हेक्षण करत असताना कुटुंबातील व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत का याची देखील चौकशी करावी. या मोहिमेत ऊस तोड कामगार, बांधकाम कामगार यांचीही आरोग्य तपासणी करुन त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेवटी केल्या.
समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे तसेच क्षयरोग निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे. मोहिमेध्ये प्रशिक्षीत पथाकद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे. संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे व समाजात क्षयरोगा विषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी या बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील 178 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
बैठकीच्या प्रारंभी सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड यांनी संगणकीय सादरी करणाद्वारे या मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाजाविषयी माहिती दिली.
या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.