
स्थैर्य, सासकल, दि. २३ सप्टेंबर : भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे धम्म सेवक संजय प्रल्हाद घोरपडे यांच्या मातोश्री, कालकथित बायनाबाई प्रल्हाद घोरपडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मौजे सासकल येथे धम्ममय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्ध परंपरेनुसार विधी संपन्न करून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात पूज्य भंते काश्यप यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली. त्यांनी बौद्ध धम्मातील अष्टांगिक मार्गापैकी ‘सम्यक दृष्टी’ व ‘सम्यक वाचा’ या दोन महत्त्वपूर्ण तत्त्वांचे विश्लेषण केले. तसेच, ‘कालकथित’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, मृत्यू हा अंत नसून मानवी जीवनातील अनित्यतेची (क्षणभंगुरतेची) जाणीव आहे. त्यामुळे स्मृतिदिन हा दुःखाचा दिवस नसून, जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा आणि धम्मानुसार केलेल्या कार्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी काम पाहिले.
याप्रसंगी, भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी आईच्या महतीवर आधारित गीत सादर करून भावनिक वातावरण निर्मिती केली.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संघटक आयु. श्रीमंत घोरपडे, फलटण तालुका महासचिव आयु. बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते, आयु. सोमीनाथ घोरपडे, संघटक आयु. आनंद जगताप यांच्यासह सासकल गावातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

