
स्थैर्य, विसापूर, दि.१९: कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर वडूज (ता. खटाव) आगाराच्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या अजूनही बंद आहेत. याचा फटका पुसेगाव-खटाव परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांना जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तसेच बस सेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, पालकांना आपल्या खासगी वाहनांतून पाल्याला शाळेत दररोज ने-आण करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाचा आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे.
खटाव तालुका उत्तर भागातील पुसेगाव, खटाव या ठिकाणी उत्तम शिक्षण व भौतिक सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील शेकडो विद्यार्थी या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महामंडळाची बससेवा सुरू न झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यात सर्वाधिक नुकसान विद्यार्थिनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येतात किंवा माघारी घरी जाऊ शकत आहेत. मात्र, विद्यार्थिनींना अनेक मर्यादा येत असल्याने आणि पालकही धजावत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर दररोजचा प्रवास खर्च करणे परवडणारे नसल्याने अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून बससेवा बंद करण्यात आली होती. आता ही परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर येत असून टप्प्याटप्प्याने शहरी भागातील व लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बससेवा अजूनही बंदच असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पुसेगाव-खटाव परिसरातील रणसिंगवाडी, शिंदेवाडी (ललगुण), औंध या गावांमध्ये मुक्कामी राहणाऱ्या बसफेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागामध्ये या बसफेऱ्यांच्या माध्यमातून शेकडो प्रवासी, शाळेच्या विद्यार्थ्यांचे येणे-जाणे महामंडळाच्या बसवरच अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय पाहता येथील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.
आमच्याकडे बससेवा पूर्णपणे बंद आहे. गावातील विद्यार्थ्यांना पुसेगाव, खटाव येथील शिक्षण संस्थांपर्यंत पोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो आहे. थंडीचे दिवस सुरू असल्याने टू व्हिलरवरून प्रवास करताना विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, रोजच्या प्रवास खर्चाचा अधिकचा बोजा आम्हा पालकांना सहन करावा लागत आहे.