फलटणमध्ये परंपरेनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी; माजी खासदार रणजितसिंह यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती


फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परंपरेनुसार अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले.

स्थैर्य, फलटण, दि. १९ एप्रिल : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज फलटण शहरात परंपरेनुसार (तिथीनुसार) अत्यंत उत्साहात आणि मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विशेष अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यासाठी परिसरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले आणि फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी उपस्थित राहून शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मोठा सहभाग:

या प्रमुख मान्यवरांसोबतच या अभिवादन सोहळ्यास फलटण नगरपरिषदेचे सर्व विद्यमान नगरसेवक, फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत महाराजांच्या विचारांचा जागर केला.

यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शहरातील शिवप्रेमी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!