कोयना धरणाच्या जलाशयात पर्यटकांना पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ अजगर


स्थैर्य, 30 जानेवारी, सातारा : कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पर्यटकांना पहिल्यांदाच दुर्मिळ अजगर आढळून आला. हा महाकाय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा (भारतीय अजगर) असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले. पर्यटकांनी जलाशयात पोहताना या अजगराचा व्हिडिओ आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आहे. हा अजगर लगतच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून वासोट्याच्या दिशेने मुनावळे परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पामुळे अलीकडे मुनावळे परिसर पर्यटकांचे नंदनवन म्हणून उदयास येत आहे. नुकताच याठिकाणी नौकाविहाराचा आनंद घेत असताना पर्यटकांना हा अजगर आढळून आला. पात्र, वासोटा किल्ल्याच्या समोरच अजगर आढळल्याने पर्यटकांमध्येखळबळ उडाली आहे. काही सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांनी अजगराला सुरक्षित रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवास्यत सोडले, इंडियन रॉक प्रजातीचा हा अजगर जंगलातून जलाशयाकडे करा पोहोचला याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इंडियन रॉक पायथॉन (भारतीय अजगर) ही संरक्षित वन्यजीव प्रजाती आहे. हे साप बिनविषारी असतात आणि भक्ष्याला विळखा घालून मारतात. याची लांबी साधारणतः साडेनऊ ते दहा फूट असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी सह्याद्रीच्या जंगलातील वन्यजीव वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

जलाशयात किंवा जंगलात अशा प्रकारचे वन्यजीव आढळल्यास करमणूक म्हणून वा उत्सुकतेने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, वन्य जीवाला त्याच्या असुरक्षेची जाणिव झाल्यास हत्ताही होवू शकतो. त्यातून जीवितासही धोका पोचण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे तत्काळ वनविभागाला कल्पना देवून जागरुकता दाखवावी.
– सुनील भोईटे,मानद वन्यजीव रक्षक, सातारा


Back to top button
Don`t copy text!