स्थैर्य, फलटण, दि. २० : पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. अश्या थोर महात्म्याचा राज्य शासनाच्या थोर पुरुषांच्या अभिवादन यादीत नाव समाविष्ट केलेले आहे. त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श आताच्या पत्रकारांनी घेणे गरजेचे आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी व्यक्त केले.
फलटण नगरपरिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांङूरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, रामराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, दैनिक सामानाचे फलटण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब ननावरे यांच्यासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ यांच्या सुरु असलेल्या जांभेकरांच्या स्मरणकार्याचा मी साक्षीदार आहे. या कार्यामुळेच खर्या अर्थाने बाळशास्त्रींची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. यंदाच्या वर्षीपासून बाळशास्त्रींना जयंतीदिनी शासकीय स्तरावरुनही अभिवादन होत आहे; ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या या मागणीची पूर्तता करुन बाळशास्त्रींच्या कार्याचा योग्य सन्मान केल्याबद्दल राज्यशासनाला नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष धन्यवाद दिले.