इंद्रयाणी तीरी देहू ग्रामी नादंरुकीच्या वृक्षस्थळी मध्यान्ह समयी फाल्गुन कृष्ण द्वितीय या दिनी तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा ही वारकरी समुदयाला पर्वणी असते.
तुकाराम तुकाराम घेता नाम कांपे यम
प्रपंच अन् परमार्थ यांची सांगड घालीत आपल्या आयुष्यात तुकाराम गाथेतून अनेकांचे माथे जाग्यावर आणले कुणालाच चांगलं म्हणायचं नाही. अशी एखाद्याला खोड असते. अशी माणसं समाजात ओळखू यायला फार उशीर लागत नाही. तेंव्हा ही माणसे आपोआप समाजातून दूर फेकली जातात. याउलट, चांगल्या माणसाची ओळख थोडी उशिराच होते, मात्र जेंव्हा होते तेंव्हा ती समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरतात. अशा लोकांचा ‘सज्जन असल्याचा’ प्रचार आपोआप होत असतो.
हे सगळं पटवून सांगताना तुकोबाराय म्हणतात,
नाही सुगंधाची लागत लावणी । लावावी तें मनीं शुद्ध होतां ।।
“पिकाप्रमाणे सुगंधाची पेरणी करावी लागत नाही. तुमचं मन चांगलं असेल, तर त्यात सद्गुण आपोआप येत असतात. चांगले विचार आपोआप रुजत असतात. मनात बसतात.” आणि मग तुम्ही सज्जन माणूस होत असता.
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचे नारायण ।।
“एकदा का तुम्ही असे सज्जन झाले, की सुगंधाचा प्रसार वाऱ्याच्या हाताने जसा आपोआप होतो, वारा जाईल तिकडे सुगंध दरवळत जातो, त्या न्यायाने तुमचाही प्रचार आपोआप होत जातो. माणसं जातील तिकडे तुमचे गुणगान गात असतात. तोंडी – तोंडी लोकांकडून तुमची स्तुती चालत राहते. एवढंच नाही, तर सज्जनांची स्तुती ज्या तोंडाने होत असते, ती तोंडे देखील प्रत्यक्ष नारायण स्वरूप होत असतात. जणू नारायण स्वतःच लोकांचं तोंड बनून सज्जन माणसाच्या प्रसाराचं कर्तव्य बजावतात.
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाही पुन्हा ।।
“खऱ्यासाठीच प्रयत्न केलेला कधीही बरा. जसं लोण्याला शेवट नाही, तसं खऱ्याला मरण नाही.” दुधाला शेवट आहे, त्याचं दही होतं. दह्याला शेवट आहे, त्याचं लोणी होतं. तसं लोण्याला शेवट नाही. ते आतून – बाहेरून सगळ्या अंगाने मऊच असतं. तसं सज्जन आतून बाहेरून सज्जनच असतो.
आणखी दुसऱ्या एका ठिकाणी अशाच आशयाचं तुकोबांनी सांगितलं की,
तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत । ते नाही लागत पसरावे ।।
जो गुणवंत असतो, त्याच्या नावाचा प्रसार करावा लागत नाही.”
तुका झालासे कळस, अणू रेणू थोकडा तुका आकाश एवढा, बुडते हे जन न देखे डोळा, आता उरलो उपकारापुरता, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचि फळ, याचीसाठी केला होता अट्हास शेवटचा दिस गोड व्हावा, आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा अश्या अवीट अभंगातून जनता जनार्दन यांना साध्या सोप्या रसाळ वाणीतून भक्ती मार्ग सांगितला.