मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर तगडा बंदोबस्त


 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: विधीमंडळाच्या हिवाळी
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात
आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मराठा आंदोलक मुंबईच्या
वेशीवर धडकले आहेत. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे मुंबईच्या वेशीवर
नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा शहरांतून
आंदोलक मुंबईत येऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. मुंबई-पुणे
एक्सप्रेस वे समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच मुंबईच्या
वेशींवरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून पोलिसांकडून वाहनांची
तपासणीही केली जात आहे.

मुंबईबाहेरून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत
येऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाशी आणि मानखुर्द दरम्यान नाकाबंदी करण्यात
आली. संशयित गाड्यांची पोलीस तपासणी करत आहेत. तसेच मुलुंड टोलनाक्यावरही
पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. अशातच कोल्हापुरातील मराठा समाजाचे काही
आंदोलक मुंबईच्या वेशीवर पोहचले, तर काही आंदोलक गनिमी कावा करून मुंबईत
रात्रीच पोहचले होते.

मराठा आरक्षाणाचा प्रश्न निकाली लागत
नसल्याने मराठा आंदोलकांनी आता मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु
केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा क्रांती
मोर्चाचे समन्वयक पोहोचू लागले आहेत. या आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या
प्रवेशद्वारावर अडवण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त
लावला आहे. कळंबोली, वाशी, मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर पोलीस
बंदोबस्त लावण्यात आला असून कार्यकर्त्यांच्या गाड्या तपासल्या जात आहेत.
ज्या गाड्यांमध्ये मराठा आंदोलक भेटतील त्यांना ताब्यात घेवून परत गावाकडे
पाठवलं जात आहे.

कार्यकर्त्यांना नोटीसा

ठाण्यात आनंदनगर येथे मुंबईच्या दिशेने चाललेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील
भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला, त्यानंतर एसटी चालकाने हा झेंडा
काढला. तसेच राज्यातील अनेक मराठा कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली
आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!