दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेतील पन्नास वर्षाच्या सुवर्णमयी वाटचाली निमित्त कृतज्ञता समारंभाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवार दि. ४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या या समारंभास सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल मा. खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या समारंभास ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा. आ. दिलीप वळसे- पाटील, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. रामशेठ ठाकूर, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. हणमंतराव गायकवाड, संस्थेचे चेअरमन मा. डॉ अनिल पाटील, व्हाईस चेअरमन मा.ॲड. भगीरथ शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संस्थेचे सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी दिली आहे.
आदरणीय खा. शरदरावजी पवारसाहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून ८ मे१९७२ मध्ये जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर अखंड १७ वर्षे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत द्रस्तेपणाने निर्णय घेतले, संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यानंतर ९ मे १९८९ रोजी त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी, जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट ज्ञान या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले. आज महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी ज्ञानाने संपन्न झालेला आपणास पहावयास मिळतो आहे. त्यामध्ये आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांनी राबवलेले अनेक शैक्षणिक उपक्रम कारणीभूत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरत नाही. मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था, संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी संभाषण वर्ग, रयत विज्ञान परिषद, राजीव गांधी सायन्स सेंटर, सेंटर फॉर इनोव्हेशन इन्वेंशन अँड इंक्युबॅशनची स्थापना, कर्मवीर भाऊराव पाटील कृषी संशोधन केंद्राची उभारणी, जलयुक्त शिवार सारखा सामाजिक उपक्रम, कोविड मदत केंद्रांची उभारणी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना या आणि यासारखे अनेक शैक्षणिक उपक्रम मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांनी आपल्या अध्यक्षीय वाटचालीमध्ये घेतले आहेत. त्यांच्या रयत शिक्षण संस्थेतील योगदानाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांनी केलेल्या असामान्य कार्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘रयतच्या विचारमंचावरून’,कॉफी टेबल बुक या ग्रंथाचे प्रकाशन,व रयतवाणीचे उद्घाटन होणार आहे.तसेच मा.शरदरावजी पवार यांचे रयत शिक्षण संस्थेतील योगदान ‘या विषयावरील माहितीपट चित्रफित दाखवली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा शहरातील शिक्षण प्रेमी, विद्यार्थी, सेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव प्रिं डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.