दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण आगार व बसस्थानक परिसरात स्वच्छतेच्या तीन-तेरा वाजल्याचे दिसत आहे. या परिसरात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दलदल माजून एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे फलटण आगाराच्या स्वच्छतेकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
फलटण आगारात बसेस धुण्याच्या रॅम्पच्या पाण्यामुळे त्या परिसरात प्रचंड झाडी वाढली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने सततच्या पाण्यामुळे अक्षरशः दलदल माजली आहे. परिणामी, एस. टी. अधिकारी, कर्मचारी, प्रवासी यांच्या आरोग्याला हानी पोहोचविणारी ही बाब लक्षात घेऊन सदर पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तातडीने करावी आणि रॅम्प परिसरासह संपूर्ण आगार व बसस्थानक परिसर एकदा सच्छ करून तेथे हवा मोकळी राहील असे वातावरण निर्माण करावे. अधिकारी व कर्मचार्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ निर्माण करून सदर वाहने आज आगारदर्शनी भागात अस्ताव्यस्त लावली जातात. ती वाहनतळावर लावण्याची व्यवस्था करावी. बसस्थानकावरील वाहनतळ असाच अस्ताव्यस्त पसरला आहे, तो व्यवस्थित करावा. बसस्थानकावर येणार्या प्रवाशांना त्याचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.