दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत टाटा टेम्पोमधून तीन गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करताना फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून वाहतुकीचा टेम्पोही जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांना मंगळवारी सायंकाळी ९ वाजता बरड गावच्या हद्दीत टाटा टेम्पो इंट्रा. (एमएच-४५-एफ-७५२५) मधून दोन गावरान गाई व एक जर्सी गाई ही कत्तलीसाठी घेऊन जात आहेत, अशी माहिती मिळाली. तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस कर्मचारी मदने, पोलीस शिपाई सावंत ढोले, चतुरे, पोलीस उपनिरीक्षक काटकर यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले असता, सदर जनावरे कत्तलीसाठीच जात आहेत, अशी त्यांची खात्री झाल्याने नवनाथ दुर्गाप्पा वाघमोडे (वय २२, राहणार माळशिरस, तालुका माळशिरस) व हुसेन रामा वाघमोडे (वय ४६, राहणार माळशिरस) या दोघा वाहतूक करणार्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रस्ता क्रमांक १६३४/ २०२३ कलम प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच ए नऊ तसेच प्राण्यांना छळवण्याचा अधिनियम कलम ११ प्रमाणे कारवाई करून जनावरे शाळेत ठेवण्यात आलेली आहेत.
या कारवाईत २ लाख रुपयांचा टेम्पो व ७५ हजार रुपयांची जनावरे जप्त करण्यात आलेली आहेत. सदर आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी घेऊन सदर जनावरे कुठून खरेदी केली व कोणाला विकणार होती, याबाबत अधिक तपास सुरू असून यापुढे जर असा गुन्हा घडला तर तडीपारीसारखी सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.