वृध्देचा सांभाळ न करणार्‍या पिंपरे बुद्रुकच्या मुलांना अटक; विक्रोळी न्यायालयाचा निकाल


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
मुले आणि सुना सांभाळत नसल्याच्या कारणावरून पिंपरे बुद्रुकच्या वृद्धेने न्यायालयात केस दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर फरार झालेल्या चौघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील विक्रोळी न्यायालयातही हजर करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथील ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय ७५) यांना प्रताप शिंदे आणि विजय शिंदे ही दोन मुले तसेच दोन सुनाही आहेत. हे सर्वजण सांभाळ करत नसल्याने त्या मुंबईत मुलीकडे आश्रयाला आहेत. याबाबत त्यांनी विक्रोळी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत केस दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाने ताराबाई शिंदे यांच्या मुला आणि सुनांविरोधात जप्ती, अटक वॉरंट काढले होते. हे वॉरंट निघाल्यानंतर संबंधित फरार झाले. तसेच ते कोठेही मिळून येत नव्हते.

दि. ८ नोव्हेंबर रोजी प्रताप आणि विजय शिंदे हे दोघेजण घरी आल्याबाबतची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हवालदार धनाजी भिसे यांच्यासह स्टाफने दोघांना ताब्यात घेतले. तर त्यानंतर दोघांच्याही पत्नीला अटक करण्यात आली. या सर्वांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तर सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, सहायक फौजदार रमेश वळवी, हवालदार धनाजी भिसे, हवालदार योगेश कुंभार, नितीन भोसले, विठ्ठल काळे, अश्विनी माने, संजय चव्हाण आदींनी कारवाईत सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!