दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२२ । फलटण । देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. अशातच पाच राज्यात निवडणुक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचा कित्ता गिरवत राज्य निवडणूक आयोग सुद्धा राज्यामधील रखडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर करू शकतात. त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आता पूर्ण जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागणे गरजेचे आहे.
उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमधील निवडणुकांची निवडणूक आयोगानं घोषणा केलीय. 10 मार्चला या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. पाच राज्यांच्या या निवडणुकीसाठी 18 कोटी 34 लाख मतदार मतदान करणार असून त्यापैकी 8 कोटी 55 लाख महिला मतदार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च, तर सातवा टप्पा 7 मार्च 2022 रोजी पार पडेल. पंजाब, उत्तराखंड व गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी या एकाच टप्प्यात मतदान होईल. मणिपूरमध्ये मतादानाच पहिला टप्पा 27 फेब्रुवारी, तर दुसरा टप्पा 3 मार्च 2022 रोजी पार पडेल. 10 मार्च रोजी पाचही राज्यांतल्या असेंब्ली निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
लोकसंख्येचा विचार करता उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठं राज्य आहेच, मात्र त्याचबरोबर राजकीयदृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. आगामी काही महिन्यांत या राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता राज्यात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.
- कोरोना काळात निवडणूक असल्यामुळे आयोगानं विशेष खबरदारी जाहीर केली आहे.
- सगळे मतदान केंद्र पूर्णपणे सॅनिटाईज केलेले असतील.
- निवडणूक अधिकाऱ्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक.
- कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासानं वाढवून देण्यात येईल.
- राजकीय पक्षांनी प्रचार डिजिटल पद्धतीनं करण्याचा सल्ला
- रोड शो, पदयात्रा, कोणत्याही प्रकारच्या सभेवर 15 जानेवारी 2022 पर्यंत बंदी, त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय. सकाळी आठ ते रात्री 8 पर्यंत बंदी.
- सार्वजनिक ठिकाणी नुक्कड सभांवर बंदी.
- निकालानंतर विजयी रॅलींवर बंदी.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना निवडणुका घेतल्या जाणार का? याविषयी साशंकता होती. कोरोना नियमावली पाळून निवडणुका आयोजित करणं हे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांपुढचं आव्हान असेल. आता ह्यामुळेच राज्य निवडणूक आयोग सुद्धा राज्यातील रखडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये जाहीर करू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.