यंदा सोहळ्याऐवजी संतांच्या पादुका वाहनांतून पंढरीला; चार संस्थांचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य पुणे दि.22 : पालखी सोहळा आणि आषाढीच्या वारीबाबत आळंदी आणि देहूसह विविध संस्थानांकडून शासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यावर 30 मे रोजी निर्णय होणार आहे. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीचा पालखी सोहळा टाळून केवळ वारीची परंपरा कायम ठेवत संतांच्या पादुका वाहनातून पंढरीला घेऊन जाण्याचा निर्णय राज्यातील प्रमुखांपैकी चार संस्थानांनी घेतला आहे. पायी वारीसाठी पाच वारकर्‍यांना परवानगीची मागणीही त्यांनी केली आहे. त्यात संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई या संस्थानांचा समावेश आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असताना त्यात शासनाला अडचणीत आणायचे नाही. संकटाचा काळ लक्षात घेता यंदा नेहमीप्रमाणे पालखी सोहळा होणार नाही. मात्र, वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका मानकरी मंडळी वाहनातून पंढरीला घेऊन जातील. त्याचप्रमाणे पाच वारकरी शासनाचे सर्व नियम पाळून वारी पूर्ण करतील, असा आमचा प्रस्ताव आहे. त्यास शासनाने मान्यता द्यावी. अशी मागणी पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखीसोहळा प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी केली आहे.

करोना विषाणूचे संकटामुळे यंदा आषाढीची वारी आणि राज्यभरातील विविध पालखी सोहळ्यांबाबत सध्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. नेहमीप्रमाणे यंदा पालखी सोहळा नको, तर केवळ वारीची परंपरा टिकावी म्हणून अत्यल्प वारकर्‍यांच्या सहभागात कोणत्याही गावात मुक्काम न करता संतांच्या पादुका पंढरपुरात जाव्यात, अशी भावना संप्रदायातील बहुतांश मंडळींकडून मांडण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराममहाराज देवस्थानमध्येही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही शासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. काही ठरावीक मंडळी पालखी सोहळ्याची भूमिका मांडत आहेत. तर, काहींनी अत्यल्पवारकर्‍यांच्या संगतीने संतांच्या पादुकांच्या वारीची भूमिका मांडली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सर्व संस्थानांच्या प्रमुखांशी चर्चा करून 30 मेनंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. वारी किंवा दिंडी काढताना शासनाची परवानगी आवश्यक असल्याचेही त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाचा निर्णय येण्यापूर्वी चार संस्थानांनी नेहमीचा पालखी सोहळा न काढता केवळ मानकर्‍यांमार्फत संतांच्या पादुका वाहनांतून पंढरीला घेऊन जातील, असा पर्याय दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!