स्थैर्य, मुंबई, दि.१४ : धनगर समाजाचा सरकारला विसर पडलाय असं म्हणत आज
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबाहेर आंदोलन केलं. महत्त्वाचे
प्रश्न तेवत ठेवण्याचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं धोरणं असल्याचं गोपीचंद
पडळकर म्हणालेत. तसा आरोप त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला आहे. आज
विधान भवनाबाहेर गोपीचंद पडळकर यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.
मागण्यांचा एक फलक गोपीचंद पडळकर यांनी हातात घेतला होता, या सोबतच ढोल
वाजवत पडळकर यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पडळकर यांच्याकडील फलक
पोलिसांकडून काढून टाकण्यात आला.
“हे सरकार झोपलेलं आहे . सरकारला जागं करण्यासाठी आज
इथे ढोल घेऊन आलो. ढोल हे आमचं पारंपरिक वाद्य आहे, त्यावर आमचे पारंपरिक
कार्यक्रम चालतात. म्हणूनच ढोल वाजवून झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं
करण्याचा प्रयन्त केला.
मी येताना १६ विविध मागण्यांचा फलक देखील आणला होता.
तो फलक पोलिसांनी मोडीत काढलेला आहे. काही कारण नसताना मला ढोल
वाजवण्यापासून देखील रोखलं गेलं. सरकारच्या सूचनेनुसार आमच्या लोककलेला
पोलिसांनी रोखलेलं आहे.
हे सरकार आल्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठीची
एकही बैठक झालेली नाही. जे आदिवासींना ते धनगरांना फडणवीसांनी दिलं होतं.
२०१९ मध्ये जुलैमध्ये आमच्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली होती. मात्र
त्यातला एकही रुपया आम्हाला मिळेला नाही.
विरोधक असताना हेच डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावरती
घोंगडी आणि हातात काठी घेऊन अनेकदा आंदोलनं करताना आपल्याला पाहायला
मिळाले होते. मात्र, जेंव्हा ते सत्तेत आलेत तेंव्हा ते धनगरांचा तिरस्कार
करतायत.
या सरकारने यशवंत महामेश योजना देखील बंद केली.
याअंतर्गत ४७ हजार रुपये भरून धनगर समाजातील १५ ते २० युवकांना ३
लाखांपर्यंतची मेंढरं मिळत होती. मात्र हे सरकार धनगरांच्या विरोधातील
सरकार आहे, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील हे सरकार आहे. माझ्या मागण्या
मांडण्यासाठी मी बोर्ड बनवून आणला होता. मात्र पोलिसांकडून तो मोडण्यात
आला, मी सरकारचा निषेध करतो,” असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.