दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
महाराष्ट्र ही साधूसंत, महात्मे, महापुरूषांची भूमी असून या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी काम केले, कोणा एका जातीसाठी नव्हे. तरीही आपण या महापुरूषांना जातीधर्माच्या चौकटीत अडकविण्याचे काम करीत असल्याची खंत व्यक्त करून यापुढे महापुरूषांची जयंती महोत्सव सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गाव-शहराच्या सार्वजनिक ठिकाणी साजरे करावेत यासाठी तालुक्यात आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे मत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.
शिंदेवाडी, ता. फलटण येथे संपूर्ण गावच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून सुभाष शिंदे बोलत होते. यावेळी शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, प्रा. रमेश आढाव, माजी प्राचार्य रविंद्र येवले, साहित्यिक तानाजी जगताप, संजय अहिवळे उपस्थित होते.
पुढे बोलताना सुभाष शिंदे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात लाखो भाविक एकत्र सहभागी होतात. यावेळी कोण कुणाला जात-धर्म विचारत बसत नाही, मात्र अलीकडे महापुरूषांच्या जयंती उत्सव जातीनिहाय साजरे होऊ लागले आहेत. हे चित्र धक्कादायक आहे.छ. शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, शाहू महाराज असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो, यांचे जयंती उत्सव सर्व समाजाने एकत्र येऊन साजरे करावेत. याशिवाय जातीयता कमी होणार नसल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट करून शिंदेवाडी क्रांतीकारकांचं गाव आहे. ही ओळख कायम राहावी यासाठीच आपण काम करीत आहे. क्रांतीकारक विचारांतून महापुरूषांनी काम केले. डॉ. आंबेडकरांनी एका समाजासाठी काम केले नाही. देशातील प्रत्येक समाज घटकासाठी काम केले. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शरद पवार काम करीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी देशाला दिशा दिली. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण आजही सर्व समाजव्यवस्थेत काम करीत असल्याचे सांगून सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकरांना मदत केली. बाबासाहेबांना जगात मोठे होता आले. अशा विद्वानाची जयंती गावात गावच्यावतीने साजरी करण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचे सांगत देशातील प्रत्येक समाजघटकासाठी काम करणार्या महापुरूषांना कोणताही धर्म नसतो, जात नसते. त्यामुळे प्रत्येक महापुरूषाच्या प्रती आपल्या भावना भारतीयत्वाच्या असल्या पाहिजेत. सर्व समाजाने एकत्र यावे, कुणाचाही व्दे-मत्सर करू नये. देशात अठरापगड जातीधर्मांना गुण्यागोविंदाने राहण्यासाठी लोकशाही व्यवस्था डॉ. आंबेडकरांनी दिली आहे. महापुरूषांचे कर्तृत्व व विचार देशाच्या विकासाचा पाया आहेत. तो मजबूत ठेवणे आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य असल्याचे सुभाषराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सौ. प्रतिभा शिंदे, तानाजी जगताप, प्रा. रमेश आढाव, रविंद्र बेडकीहाळ, रविंद्र येवले सर आदींनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटातील विविध पैलूंवर विचार व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवा उद्योजक अमित शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हायस्कूलच्या शिक्षिका मंगल पवार यांनी केले.
कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिंदेवाडी, खुंटे, कांबळेश्वर, पाटणेवाडी, वडजल या भागातील ग्रामस्थ, शरद प्रतिभा हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी , ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सरपंच निर्मला शिंदे, उपसरपंच अनिल शिंदे, अमोल रवलाटे, आनंदराव यादव, शिवाजी यादव, दादासाहेब यादव, शामराव भिसे, सुनिल माने, विनोद शिंदे, कांता सूळ, दिलीपराव खलाटे यावेळी उपस्थित होते.