स्थैर्य, दि.१९: जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, जगातील 13 देश आता कोरोना मुक्त झाले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. मात्र येथे अजूनही खबरदारी घेणे आवश्यक आहे. चिंतेची बाब म्हणजे जगातील 131 देशांमध्ये संक्रमणाचे कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे. यामध्ये अमेरिका, पाकिस्तान, ब्राझील, ब्रिटेन, फ्रान्स यासारख्या मोठ्या देशांचा समावेश आहे. भारत सध्या क्लस्टर ऑफ केसच्या श्रेणीत आहे. म्हणजेच अद्याप येथे कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाली नाही.
जानेवारीत सर्वाधित रुग्ण आढळले तसेच सर्वाधिक मृत्यू
जगातील बर्याच देशांमध्ये लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असला तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. किमान आकडेवारी याकडे लक्ष वेधत आहे. जानेवारीच्या या 18 दिवसांत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आणि सर्वात जास्त मृत्यूही झाले आहेत. 8 जानेवारी रोजी जगात सर्वाधिक 8 लाखाहून अधिक रुग्ण आढळले. यापूर्वी इतके रुग्ण कधीच सापडलेले नव्हते. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी सर्वाधिक 16 हजार 537 लोकांनी आपला जीव गमावला.
आतापर्यंत 9.60 कोटी प्रकरणे
जगभरात आतापर्यंत 9 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले. दिलासादायक बाब म्हणजे यातील 6 कोटी 86 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 20 लाख 49 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. सध्या 2.53 कोटी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 1.12 लाख रुग्णांची प्रकृती नाजूक आहे. ही आकडेवारी worldometers.info नुसार आहे.