दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
श्री गोपाल कृष्ण मंदिर, गिरवी (ता. फलटण) येथे वैशाख पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहाने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला.
२१ मे रोजी नरसिंह जयंतीनिमित्त पहाटे अभिषेक तसेच दुपारी आरती व सायंकाळी सर्व भक्तांना डाळ व पन्हे असा प्रसाद वाटण्यात आला. दि. २३ मे रोजी वैशाखी पौर्णिमा या दिवशी पहाटे श्रीगोपाल कृष्ण भगवान यांना अभिषेक तसेच कृष्ण भक्त बाबूराव देशपांडे महाराज यांच्या समाधीस अभिषेक, सकाळी सूक्त पठण, सकाळी दहा वाजता ह.भ.प. संतोष भोळे यांचे किर्तन, दुपारी आरती व महाप्रसाद तसेच दहिवडी येथील महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व पालखी सोहळा पार पडला.
दि. २४ मे रोजी फलटण येथील महिला मंडळाने विष्णूसहस्त्रनाम पठण व गीता अध्याय तसेच फलटण येथील भजनी मंडळाचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. दुपारी आरती महाप्रसाद, संध्याकाळी ह.भ.प. संतोष भोळे यांचे काल्याचे कीर्तन व यामध्ये बालगोपाळांनी विविध खेळ सादर केले व दहीहंडीचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला.
तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात सातारा, फलटण व गिरवी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नियोजन देवस्थान प्रमुख जयंतराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत देशपांडे व शुभदा देशपांडे यांच्या सहकार्याने झाले.
दरम्यान, रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे ग्रामस्थांनी गोपाळ कृष्णाची कृपा झाली, अशी धारणा व्यक्त केली.