स्थैर्य, हिसार, दि. १२: जिद्द आणि नवं काही करून पाहायची उर्मी असेल तर खडकालाही कोंब फुटू शकतो, असं म्हणतात. अगदी शब्दशः नाही पण त्याच तोडीचं काम या दोन सख्ख्या भावांनी करून दाखवलं आहे. मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर त्यांनी घराच्या गच्चीवर चक्क केशराची बाग फुलवली आहे. हरियाणा इथल्या हिसारच्या दोन युवकांची कौतुकास्पद यशकथा कोरोनाच्या संकटकाळात समोर आली आहे. या दोन भावांनी अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणत शब्दश: घरबसल्या लाखोंची कमाई केली आहे.
हिसारच्या दोन तरुण शेतकऱ्यांनी (farmer brothers) आपल्या घराच्या गच्चीवर (terrace) केशराची शेती केली. या यशस्वी प्रयोगानं सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. कारण आजवर केशराची शेती केवळ जम्मू-काश्मीरमध्येच होत असे. या दोघांनी मात्र एका खास पद्धतीचा अवलंब करत शेती यशस्वी केली आहे.
या दोघांनी केशर उगवण्यासाठी एयरोफोनिक पद्धत वापरली आहे. या पद्धतीनं केशर उगवून दोघांनी जवळपास 6 ते 9 लाख रुपयांचा फायदा कमावला आहे. लॉकडाऊनच्या (lock down) काळात या दोघांनी हे साध्य केलं. आजवर केशर उगवायला एयरोफोनिक पद्धत केवळ इराण, स्पेन आणि चीनमध्येच वापरली जात असे. मात्र या दोघांचा विश्वास आहे, की मेहनत आणि नियोजनानं कुठलंही काम केलं तर ते यशस्वी होतंच.
प्रवीण आणि नवीन सांगतात, की हा प्रकल्प हातात घेऊन हरियाणाचे शेतकरी नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न साकारू शकतात. एक नवा प्रकल्प सुरू करायला 7 ते 10 लाख रुपये लागतात. एका वर्षात शेतकरी 10 ते 20 लाखांचा नफा कमावू शकतो.
या भावांनी हरियाणा सरकारकडे मागणी केली आहे, की केशराच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जावं. कुणाला हा व्यवसाय करायचा असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा असंही या भावांनी म्हटलं आहे.
कोथकला इथं हे दोन सख्खे भाऊ राहतात. नवीन आणि प्रवीण अशी त्यांची नावं आहेत. युट्युब आणि गूगलवरून त्यांनी या सगळ्याचं ज्ञान मिळवलं. २५० रुपये प्रती किलोनं केशराच्या बिया जम्मूमधून विकत आणल्या. आपल्या आझाद नगर इथल्या घरात 15 बाय 15 आकाराच्या खोलीतल्या छतावर शेती सुरू केली. हा प्रकल्प त्यांनी ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केला.