दैनिक स्थैर्य | दि. 27 ऑगस्ट 2024 | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मनाला हे लावून टाकणारी घटना घडली आहे. आठ महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाने उभा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे जमीनदोस्त झाला. यावर राज्यात विविध चर्चा सुरू आहेत. परंतु फलटणचे भाग्यविधाते श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी सन 1957 मध्ये किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिमाखात उभा केला होता. त्याचे उद्घाटन सुद्धा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. आजही प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेवढ्याच दिमाखात उभा आहे. या पुतळ्याने अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा सातारा जिल्ह्यातील प्रतापगड ३५० वर्षानंतरही आजही दिमाखात उभा आहे. स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाला याच मातीत छत्रपतींनी गाडला व त्यामुळे स्वराज्यास बळकटी मिळाली आणि प्रतापगड हा स्वराज्याची पहिली राजधानी बनला. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने स्वराज्यावरील संकट दूर झाले. मात्र या गडावर उभारण्यात आलेल्या छत्रपतींचा भव्य लढाऊ अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा इतिहास आजच्या पिढीला माहिती आहे का? तर याचे उत्तर बहुदा नाही असेच असेल.
या पुतळ्याच्या उभारणी मध्ये प्रामुख्याने फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालजीराजे नाईक निंबाळकर यांचे खूप मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी छत्रपती सईबाई महाराणी साहेब याच नाईक निंबाळकर घराण्यातील. छत्रपतींच्या शौर्याची, कर्तृत्वाची साक्ष देणारे काहीच स्मारक प्रतापगडावर उभारलेले नव्हते. ही बाब श्रीमंत मालोजीराजे यांच्या लक्षात आल्यावर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले.
श्रीमंत मालोजीराजे त्यांच्याच पुढाकाराने, त्यांच्याच अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समिती’ची स्थापना झाली. यामध्ये छत्रपती सुमित्राराजे भोसले राणीसाहेब सातारा या स्वागताध्यक्ष, तर श्रीमंत मालोजीराजे अध्यक्ष, तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई, गणपतराव तपासे, किसन वीर, डी एस जगताप, बाबासाहेब शिंदे हे सभासद म्हणून कार्यरत होते.
त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांना व मंत्रिमंडळाला ही सर्व कल्पना श्रीमंत मालोजीराजांनी सांगितली. सर्वांनी त्याला मान्यता दिली व श्रीमंत मालोजीराजेंनाच याबाबतचे सर्व अधिकारही दिले. तत्कालीन मुंबई राज्याचे राज्यपाल डॉ.हरेकृष्ण मेहताब यांनी सन१९५५ मध्ये प्रतापगडावर छत्रपतींचे स्मारक असावे या गोष्टीसाठी चालना दिली व या समितीची पहिली बैठक दि. ८ जून १९५५ रोजी राजभावनात होऊन या स्मारकाची योजना ठरवली गेली.
या योजनेप्रमाणे प्रतापगडावर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणे, पुतळ्याभोवती बाग बगीचा करणे, गडावर येण्यासाठी रस्ता तयार करणे. अशा महत्त्वाच्या बाबी ठरविण्यात आल्या.
नंतर सदर पुतळ्याचा अनावरण समारंभ भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात हस्ते व्हावा असेही ठरले. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकार कामत यांनी या कामाची जबाबदारी घेऊन हा भव्य पुतळा मेहनतीने अल्पावधीत (सुट्ट्या भागात) पूर्ण केला. पुण्याचे एन.जी.पवार इंजिनिअर यांनी पुतळ्याचा सभोतालचा व त्या भोवतीचे किल्ल्याचे तटवजा बांधकाम अतिशय अडचणीच्या परिस्थितीत, गडावर सामान नेण्याच्या अत्यंत कठीण परिस्थिती असताना सुद्धा सुबक रितीने केले.
मराठी माणसाची अस्मिता आणि प्रेरणा असलेल्या स्मारकासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी अविरत परिश्रम घेतले. प्रसंगी लागेल तो खर्च ते स्वतः करीत. अखेर त्यांच्या कल्पनेनुसार अश्वारूढ असा भव्य पुतळा तयार झाला पण तेव्हा गडावर जाण्यासाठी रस्ता सुस्थितीत नव्हता त्यामुळे सर्वात प्रथम त्यांनी सरकारच्या मदतीने गडावर मोटारी जातील असा रस्ता केला. शिवछत्रपतींचा पुतळा अगदी भव्य असा झाला होता तो जसाच्या तसा वरती नेणे त्या काळात शक्य नव्हते. मग त्याचे सुटे भाग करून ते प्रतापगड खोऱ्यातील शेतकरी तरुण कार्यकर्ते या मावळ्यांच्या एकजुटीने गडावर नेण्यात आले आणि मग शिवस्मारकाच्या जागेवर उभारलेल्या भव्य चबुतऱ्यावर पुतळ्याचे सुट्टे भाग जोडून अखंड छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला.
या पुतळ्याचे अनावरण दि. ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले. प्रतापगडच्या या समारंभाच्या माध्यमातून काँग्रेसलाही बळकटी मिळण्यास मदत झाली. त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीत सुरू असलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा व त्याचे व्यापक स्वरूप पंडित नेहरूंना यशवंतराव चव्हाण व श्रीमंत मालोजीराजांनी लक्षात आणून दिले. या कार्यक्रमासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना गनिमी काव्याने कास पठार मार्गे प्रतापगडावरती आणण्यात आले होते.
या योजनेचे नियोजन श्रीमंत मालोजीराजे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या निदर्शकांना पाहिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर आणि मुंबई महाराष्ट्राच ठेवण्याबाबतची मराठी माणसाची भावना तीव्रतेने पंडितजींच्या लक्षात आली. व एका अर्थाने पंडित नेहरूंचे मत परिवर्तन होण्यास मदत झाली. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे मराठी माणसाचे स्वप्न साकार होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
अशा या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या प्रतापगडच्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून या युगपुरुषाची व स्वराज्य संस्थापकाची स्मृती जागृत ठेवण्याचे महान कार्य श्रीमंत मालोजीराजे यांनी केले होते व आजही हा पुतळा ऐतिहासिक अश्या इतिहासाची साक्ष देतो.