माऊली फाउंडेशन व नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांच्या पुढाकाराने आयोजित ‘एसटी बस स्मार्ट कार्ड’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद!


स्थैर्य, फलटण, दि. २० एप्रिल : माऊली फाउंडेशन आणि फलटणच्या सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘एसटी बस स्मार्ट कार्ड’ कॅम्पला नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कॅम्पमध्ये सुमारे ८०० महिलांनी सहभाग घेत आपले स्मार्ट कार्ड काढून घेतले असल्याची माहिती कु. सिद्धाली शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा कडक उन्हात नागरिकांना आणि वयोवृद्ध महिलांना एसटी बसचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागू नये, या उदात्त हेतूने हा विशेष कॅम्प कु. सिद्धाली शहा यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या स्तुत्य उपक्रमामुळे वॉर्डातील अनेक महिलांची मोठी गैरसोय टळली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अल्पावधीतच मोठ्या संख्येने महिलांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आयोजकांना यश आले आहे. कॅम्पचे नियोजन अत्यंत सुयोग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आल्याने स्मार्ट कार्ड काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जलद व सुरळीत पार पडली. सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेचा आणि त्रासाचा विचार करून हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल कु. सिद्धाली शहा यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे महिलांना प्रवासासाठी आवश्यक असलेले स्मार्ट कार्ड अतिशय सहजतेने उपलब्ध झाले.

सदर कॅम्पचे यशस्वी नियोजन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली फाउंडेशनच्या सर्व विश्वस्तांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सुविधेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!