
स्थैर्य, गिरवी, दि. ३१ जानेवारी : कोळकी जिल्हा परिषद गटाचे रणशिंग फुंकले गेले असून, भारतीय जनता पार्टीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. गिरवी येथील बौद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या कोपरा प्रचार सभेत बोलताना फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “मोठ्या माणसाचा मुलगा गरिबांची कामे कधीच करत नाही, त्यामुळे केवळ भावनिक होऊन स्वतःच्या गावाचे आणि जिल्ह्याचे नुकसान करून घेऊ नका,” अशा शब्दांत त्यांनी राजे गट प्रणित शिवसेनेचे उमेदवार सह्याद्री कदम यांचा नामोल्लेख टाळत समाचार घेतला.
यावेळी व्यासपीठावर कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपा उमेदवार जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार विकास नाळे, गिरवीचे नेते बाळासाहेब कदम, माजी सरपंच विजय कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यावर गिरवीची साथ भाजपालाच
आमदार सचिन पाटील पुढे म्हणाले की, “गिरवी गावातील बौद्ध वस्तीमध्ये आज जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून जयकुमार शिंदे आणि विकास नाळे हे ऐतिहासिक मताधिक्याने निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. जो माणूस स्वतःच्या गावाचा विकास करू शकला नाही, तो या जिल्हा परिषद गटाचे काय काम करणार? जनतेने आता आरसा पाहिला आहे. विकासासाठी भांडणारा कार्यकर्ता हवा असेल, तर जयकुमार शिंदे आणि विकास नाळे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.”
खासदार गटाच्या शिलेदारांचे पारडे जड
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवडणूक प्रचार सुरू आहे. जयकुमार शिंदे यांचा मागील ७ वर्षांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस पदाचा अनुभव आणि विकास नाळे यांची तळागाळातील ‘हाडाचा कार्यकर्ता’ अशी असलेली ओळख भाजपाच्या विजयासाठी पोषक ठरत आहे.
विरोधकांच्या ‘भावनिक’ कार्डला मतदारांची चपराक
कोळकी गटात जयकुमार शिंदे यांच्या विरोधात सह्याद्री चिमणराव कदम, तर विकास नाळे यांच्या विरोधात डॉ. अशोक नाळे उभे आहेत. मात्र, आमदार सचिन पाटील यांनी मतदारांना सावध करताना सांगितले की, निवडणुका केवळ वारसा हक्कावर नाही तर कामाच्या जोरावर लढल्या जातात. “प्रशासकीय कामांचा अनुभव असणारे जयकुमार शिंदे आणि जनतेच्या सुख-दु:खात धावून जाणारे विकास नाळे हेच कोळकीचा कायापालट करू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेत गिरवी गावातील शेकडो नागरिकांनी ‘कमळ’ चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. बाळासाहेब कदम आणि विजय कदम यांनीही स्थानिक पातळीवर भाजपाची बाजू भक्कम असल्याचे सांगत विजयाचा विश्वास दिला.

