
स्थैर्य, सातारा, दि. ०९ : कोरोना महामारीत जिल्ह्यात बाधितांचा आकडा पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दररोज सरासरी चार ते पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विशिष्ट नियमावली आहे. नातेवाईकाना जरी परवानगी असली तरी पीपीई किट घालून लांबूनच दर्शन घ्यावे असे नियमात आहे. सातारा पालिकेने तयार केलेले पथक सदैव तयार असते. अगदी रात्रीचा जरी फोन आला तरी हे पथक लगेच जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेऊन कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात. स्वतःची काळजी घेतात शिवाय कुटूंबाची सुद्धा.जिल्हा परिषदेकडून त्यांना पीपीई किट दिले जाते आहे.
कोरोना या महामारीमुळे मरण स्वस्त झाले आहे. मृत्यू दर वाढला आहे. सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आहे.तेथे कोरोना बाधितावर उपचार केले जातात.शहरात संजीवन हॉस्पिटल, सातारा हॉस्पिटल, मंगलमूर्ती, साई अमृत, सिम्बॉसिस, समर्थ या हॉस्पिटलमध्ये बाधित रुग्णावर उपचार केले जातात.उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण येत आहेत.काहींचा उपचारादरम्यान मृत्यु होतो तेव्हा त्यांच्या गावी कोव्हिडंच्या नियमांने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा नाही.सातारा पालिकेकडे ती असल्याने पालिकेचे पथक तयार असते. जिल्हा रुग्णालयातून पालिकेकडे पत्र येते.पत्र येताच केवळ अर्ध्या तासात ही टीम पीपीई किट घालून रुग्ण वाहिका, सॅनिटायझर गाडी घेऊन तेथे पोहचते.मृतदेह व्यवस्थित पॅक केलेला आहे हे पाहूनच ते पथक पुढची कार्यवाही करते. एका लाकडी पेटीत तो मृतदेह ठेवून ती पेटी रुग्ण वाहिकेतून कैलास स्मशानभूमीत नेली जाते.स्मशानभूमीत कोरोना बाधित मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळे अग्निकुंड राखीव आहेत. तेथे पालिकेचे कर्मचारी नियमानुसार अंत्यसंस्कार करतात.अंत्यसंस्कार करतेवेळी जी नियमावली आहे त्यानुसार कार्यवाही केली जाते.अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर अंगावरचे पीपीई किट काढून हातातील हँड ग्लोज काढून ते सोबत आणलेल्या गाडीतल्या एका पिंपात टाकून डिस्ट्रॉय केले जाते.स्मशानभूमी दहन केल्यानंतर सॅनिटायझर केले जाते.निर्जंतुक फवारणी करून पुन्हा दुसऱ्या कार्यवाहीसाठी हे पथक तयार असते.
सातारा तालुक्यातील बाधितांचा आकडा 1 हजारच्या जवळपास पोहचला आहे.कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची संख्या सुमारे 4 ते 5 एवढी दररोज होत आहे.त्यामुळे स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या टीमचे कौतुक होत आहे.
कोरोना हा आजार भयानक आहे असे सध्या बिंबवले गेले असल्याने प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबत भीती आहे.अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या पद्धती आहेत.त्यात नातेवाईक महत्वाची भूमिका पार पाडत असतात.परंतु कोरोनामुळे सर्व विधी नातेवाईकांनी करण्याऐवजी ते पालिकेचे पथक करते.अगदी सरण रचून पूर्णपणे दहन होई पर्यंत हे पथक कार्यवाही करते.हे काम करताना थोडी पण निष्काळजीपणा घेऊन चालत नाही.स्वतःच्या काळजावर दगड ठेवून दिलेली जबाबदारी पार पाडतात.त्यामुळे या कोरोना योद्यांचा सन्मान केला जात आहे.