धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, येथील सर्वसामान्य माणूस देवभक्त असून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजनादी कार्यक्रमातून होणारे सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरत असल्याचे शासन/प्रशासनाला ज्ञात आहे, यापूर्वी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन, किंवा ग्रामगीतेमधून नागरी सुविधा, ग्रामीण विकास याचे प्रबोधन तर वर्षानुवर्षे झाले असताना,  तरीही राज्यभर या सर्वांवर बंदी घालुन शासन/प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे असा सवाल ज्येष्ठ कीर्तनकार युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे.

करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासन/प्रशासनाने आषाढी, चैत्री वारी बंद केली, सर्व मंदिरे बंद ठेवली आहेत, मात्र लग्न सोहळ्यांना शासन/प्रशासन संख्येची मर्यादा घालुन परवानगी देत आहे, त्याचप्रमाणे मंदिरे खुली केली, कीर्तन, प्रवचन, भाजनांना परवानगी दिली तर अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर करोना संबंधी योग्य प्रबोधन त्यामाध्यमातून मास्क, सॅनिटायझर वापर, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे ह्या बाबी कीर्तनकार, प्रवचनकार सर्व सामान्यांना खूप चांगल्या प्रकारे समजावून देतील याची ग्वाही ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र अध्यत्मिक भूमी आहे, पंढरीचा पांडुरंग हे वारकरी सांप्रदायाचे आद्यपीठ आहे तर संतांची तीर्थक्षेत्र ही विद्यपीठे आहेत. या क्षेत्रावर सामाजिक अंतर राखून भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु करणे गरजेचे आहे. शासनाने चैत्री व आषाढी वारीवर बंदी घातली त्यावेळी संपूर्ण जगावर करोनाचे महासंकट आल्याने  वारकऱ्यांनीही शासनाला साथ केली, आता करोनाच्या या काळात शासनाने विवाह सोहळ्यांना परवानगी दिली आहे, सोशल डिस्टन्स सांभाळून व कमी गर्दी करुन विवाह सोहळे संपन्न होत आहेत, सर्व शासकीय कार्यालये, दळणवळण, बाजारपेठा आदी सर्व सुरु झाले असताना धार्मिक कार्यक्रमांनाच का परवानगी देत नाही असा सवाल ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!