
स्थैर्य, फलटण दि.23 : ना अंगावर पूर्ण कपडे, ना रात्री घ्यायला पांघरुण अशा स्थितीत जगणारे अनेक निराधार व बेघर फलटण शहरात आहेत. त्यातच थंडी सुरु झाल्यानंतर या निराधारांना आपली रात्र अशीच कुडकुडत कशीबशी काढावी लागते. याच कठीण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शारवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील निराधार व बेघर लोकांना ब्लँकेटचे वाटप करुन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे.
गरीब – गरजू लोकांच्या चेहर्यावर आनंद पाहणे या उद्देशातून शारवा फौंडेशन ही संघटना युवकांनी एकत्र येवून स्थापन केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यातही सामाजिक कार्य सुरु आहे. याचाच भाग म्हणून फलटण शहरात बेघर व निराधार व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल सर्वांनी शारवाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.