
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २४: देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होईल. 10 हजार सरकारी केंद्रांवर आणि 20 हजार खासगी हॉस्पीटलमध्ये लस दिली जाईल. यात 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना आणि 60 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना मोफत लस दिली जाईल. परंतु, मोफत लस फक्त सरकारी केंद्रांवर उपलब्ध असेल, खासगी केंद्रांवर त्या लसीचे पैसे द्यावे लागतील.
3-4 दिवसात खासगी केंद्रांवरील लसीकरणाच्या फीसवर निर्णय
याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, सरकारी केंद्रांवर लसीकरण मोफत असेल, पण खासगी हॉस्पीटलमध्ये त्यांना पैसे द्यावे लागतील. या केंद्रांवर किती फीस आकारली जाईल, याबाबत येत्या 3-4 दिवसात आरोग्य मंत्रालय निर्णय घेईल.
लसीकरणात भारत 5 व्या स्थानी
जगभरातील अनेक देशांनी, विशेष चीनने मागच्या वर्षी जूनमध्ये आणि रशियाने ऑगस्टमध्ये लसीकरणाला सुरुवात केली होती. तर, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी डिसेंबरमध्ये लसीकरणाला सुरुवात केली होती. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची सुरुवात झाली. 22 फेब्रुवारीपर्यंत जगभरातील 21 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. सर्वात जास्त लसीकरण अमेरिकेत(6.41 कोटी) झाले. यानंतर चीनमध्ये 4.05 कोटी, यूरोपीय संघात 2.7 कोटी, यूके 1.8 कोटी आणि नंतर भारतात 1.19 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

