दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । फलटण ।
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 18 ते 23 जून दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून आज पालखी सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
श्री माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी खूप चांगले काम केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी माऊलीच्या पालखीचे केले सारथ्य
जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी राजुरी पासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. हरी नामाचा गजर करीत पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला.
सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी – सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.