स्थैर्य, दि १: दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाप्रती ट्रुडो यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करेन, असंही त्यांनी म्हटलं आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता हे आपलं प्राधान्य असायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान भारताने ट्रुडो यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ट्रुडो यांचे वक्तव्य अयोग्य असून, लोकशाही देशाच्या अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असं भारताने म्हटलं आहे. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, डावपेचात्मक संवादाला राजकीय हेतूने मांडणं योग्य नाही.
शेतकरी आंदोलनासंदर्भात कॅनडाच्या नेत्यांची तथ्यांना धरून नसलेली वक्तव्यं आम्ही पाहिली. कोणत्याही लोकशाही देशाच्या अंतर्गत मुद्यांवर बोलणं योग्य नाही. दरम्यान कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चा सुरू आहे. दिल्लीतल्या विज्ञान भवनात ही चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री पीयुष गोएल तसंच सोमप्रकाश उपस्थित आहेत. दरम्यान नागरिकता दुरुस्ती विधेयकाला राजधानी दिल्लीत शाहीन बाग या ठिकाणी मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनाचा चेहरा असलेल्या बिल्कीसबानो दादी शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या.
पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याची आई आहे म्हणूनच केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी आली आहे, असं त्यांनी अटकेपूर्वी सांगितलं.