स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१५: ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बंगळुरूच्या 22 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी तिच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. सोमवारी निकिता जॅकब आणि शांतनुविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, दिशा, निकिताने जूम अॅपवर खालिस्तानी समर्थक आणि पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा फाउंडर एम.ओ. धालीवालसोबत मीटिंग केली होती. या मीटिंगचा उद्देश 26 जानेवारीपूर्वी सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा होता.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 4 दिवसांपूर्वी एक स्पेशल टीम निकिताच्या घरी गेली होती. तेथून तिचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करुन तपास करण्यात आला. यानंतर पोलिस परत तिच्या घरी गेले असता, ती निघून गेली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर निकिताने मुंबई उच्च न्यायालयात ट्रांजिट बेलसाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी होईल.
काँग्रेसचा विरोध
दरम्यान दिशाच्या अटकेनंतर शेतकरी आणि काँग्रेसने तिच्या अटकेचा विरोध सुरू केला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले की, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे टूलकिट भारतीय सीमेतील चीनच्या घुसखोरीपेक्षा जास्त धोकादायक आहे का ? शेतकरी नेते दर्शनपाल म्हणालेकी, सरकारने दिशाची तात्काळ सुटका करावी. अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाच्ची मीना हॅरिस यांनी सोशल मीडियावर लिहीले की, भारत सरकार अॅक्टिव्हिस्टला टार्गेट का करत आहे ?
हे टूलकिट तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा स्वीडनची पर्यावरण बदल कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने याला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. ग्रेटाने टूलकिट शेअर करण्यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिटबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
भारत अर्थ नसलेल्या गोष्टींना प्राधान्य देत आहे – चिदंबरम
चिदंबरम म्हणाले की, ‘भारत अर्थ नसलेल्या गोष्टींना प्राधान्य देत आहे आणि दिल्ली पोलिस हुकूमशहाच्या हातातील बाहूली बनली आहे.’ माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, ‘हे तुच्छ कारस्थान आहे. अनपेक्षित शोषणा आणि गुंडगिरी आहे.’ काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, ‘भारतातील शेतकरी आंदोलन दाबण्यासाठी ज्याप्रकारे राजकीय विरोध आणि वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, दिशाची अटक त्यातील एक भाग आहे. सरकारला जगभरात आपली प्रतिमा मलिन होण्याची चिंता नाही ?’
डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी म्हणाले की, मोदी सरकारला असे वाटत असेल की, शेतकऱ्याच्या नातीला पकडल्यामुळे शेतकरी आंदोलन कमजोर होईल. पण, ही अटक देशातील तरुणांना जागे करेल आणि नवीन लोकशाहीची सुरुवात होईल. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, ‘जे लोक आपल्या शब्दांच्या टूलकिटने देश आणि समाजातील एकता तोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कधी अटक होईल ?’
मीना हॅरिस म्हणाल्या- अटकेवर सरकारला प्रश्न विचारा
व्यवसायाने वकील असलेल्या मीना हॅरिस यांनी दिशाच्या अटकेवर केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर लिहीले की, ‘भारतीय अधिकाऱ्यांना अजून एक फीमेल अॅक्टिविस्ट दिशा रवीला अटक केली, कारण तिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टूलकिट पोस्ट केले. लोकांनी सरकारला विचारायला हवे की, फक्त आंदोलकांनाच टार्गेट का केले जात आहे ?’
दिशाला 5 दिवसांची कोठडी
दिशा फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. दिल्लीच्या कोर्टाने तिला 5 दिवसांच्या स्पेशल सेलच्या कस्टडीमध्ये पाठवले आहे. पोलिसांनी तिला रविवारी 4 वाजता सायबर सेलच्या द्वारका ऑफिसमध्ये आणले होते. येथेच तिची पुढील चौकशी केली जाईल. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, दिशानेच टूलकिटला गूगल डॉक बनवून सर्कुलेट केले होते.
ट्विटरने डिलीट केले होते ग्रेटाचे ट्वीट्स
ग्रेटाने 3 फेब्रुवारीला ट्वीट करुन शेतकरी आंदोलानाला पाठिंबा दिला होता. तिने यात एक टूलकिट शेअर केली होती. यात 26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती होती. यानंतर ट्विटरने ग्रेटाचे ते ट्विट्स डिलीट केले होते.
यानंतर बातम्या आल्या होत्या की, दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, एफआयआरमध्ये कोणत्याची ठराविक व्यक्तीचे नाव लिहीले नाही.