
दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जनसेवा वाचनालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार, ९ सप्टेंबर रोजी मॅग आणि माऊली फाउंडेशन संचालित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सुप्रसिद्ध लेखक व प्रेरणादायी वक्ते श्रीयुत मनोज अंबिके यांनी ग्रंथालयाचे फीत कापून उद्घाटन केले. सांगली येथील वाचकप्रिय वाचनालयाच्या संचालिका श्रीमती विजया हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती.
मॅग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अनिल मोहटकर यांनी प्रास्ताविक करताना पुस्तक वाचल्याने जीवन कसे घडले, हे सांगितले.
माऊली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अॅड. श्री. विश्वनाथ टाळकुटे यांना आजच्या मोबाईलच्या काळात वाचनसंस्कृती वाढवण्याची अत्यंतिक गरज निर्माण झाल्याचे जाणवले व त्यांनी सर्वांसाठी अत्यल्प दरात वाचनाची सोय करण्याचे ठरवले. विश्वनाथ टाळकुटे यांनी हा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सर्व थरातून अत्यंत उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत गेला व अल्पावधीत जनसेवा वाचनालयाची कशी उभारणी झाली, हे सांगितले व या वाचनालयासाठी काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व आभार मानले.
श्रीमती विजया हिरेमठ यांनी सांगली येथे आपल्या नऊ मैत्रिणींबरोबर सुरुवात केलेले वाचनालय आज अत्यंत मोठ्या स्वरूपात सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या वाचन चळवळीचा वृत्तांत ऐकताना सर्व श्रोते भारावून गेले.
प्रमुख वक्ते श्री. अंबिके यांनी घरात लक्ष्मीच्या जोडीनेच सरस्वतीलाही जागा असावी. यामुळे आपले जीवन वेगळ्या अर्थाने सुसंस्कारित व समृद्ध होते, असे सांगितले.
श्री. अरविंद मेहता यांनी फलटण नगरीत १२५ वर्षांपासून एक वाचनालय चालू आहे आणि फलटणचे नागरिक रसिक आणि वाचनप्रिय आहेत. या जनसेवा वाचनालयालाही उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी ग्वाही दिली.
या वाचनालयाची उभारणी अल्पावधीत करण्यासाठी श्रीयुत उस्मान शेख, विष्णू शिंदे, हरिष महामुनी आणि तात्या गायकवाड, पराग नडगिरे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
अॅड. श्री. राहुल कर्णे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.