दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | सातारा |
सातारा शहरातील एका भंगार व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी लल्लन टोळीला पुन्हा गजाआड केले आहे. अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय २८), ऋषिकेश उर्फ डोंगुल्या नाना कांबळे (वय २३), सर्जेराव उर्फ छोटया पांडूरंग कांबळे (वय २०, तिघे रा. प्रतापसिंहनगर, सातारा) आणि विलास उर्फ यल्या शरणाप्पा कुरमणी (वय २२ रा. वनवासवाडी, सातारा) अशी टोळीतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील भंगार व्यावसायिक विक्रम आशरू वाघमारे (रा. संगमनगर, सातारा) यास मोक्का केसमध्ये तुरूंगात असलेल्या दत्ता जाधव (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याचा मुलगा लल्लन जाधव याने तुझ्यामुळे माझा बाप मोक्काच्या केसमध्ये जेलमध्ये आहे, त्याला तू जबाबदार असून त्यास जेलमधून बाहेर काढण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली व रक्कम दिली नाही तर जिवंत ठेवणार नसल्याची धमकी ३ जून २०२३ रोजी दिली होती. त्यानंतर रात्री लल्लन जाधव व त्याच्या साथीदारांनी वनवासवाडी, ता. जि. सातारा येथे विक्रम वाघमारे याच्यावर खंडणी न दिल्याने धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते. तसेच त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेवून ते पळून गेले होते.
मोक्का केसमधून लल्लन जाधव हा नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याने त्याच्या अन्य साथीदारामार्फत सदर परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. त्यास पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी त्यास तात्काळ पकडणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे हेमंतकुमार शहा यांनी डी. बी. पथकास मार्गदर्शन केले. डी. बी. पथक त्यांचा शोध घेत असताना सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जावून संशयितांची माहिती प्राप्त केली.
टोळीतील संशयित हे जत तालुक्यातील एका डोंगरकपारीत आसरा घेवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. संशयित अत्यंत खूनशी व सराईत असल्याने त्यांना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. पथकातील काही पोलिसांनी विशिष्ठ वेशभूषा करून आरोपींच्या ठावठिकाण्याची माहिती घेतली. त्या ठिकाणी जात असताना काळोख झालेला होता व ठिकाण अत्यंत निर्जन असल्याने संशयितांना चाहूल लागण्याची दाट शक्यता वाटू लागली. यामुळे पथकाने डोंगरकपारीमध्ये ठिकठिकाणी रात्रीचे थांबून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. संशयित हे डोंगरकपारीतून बाहेर येत असल्याची हालचाल दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यांना चारही बाजूने घेरले व संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुधीर भोरे, पो. हवा. श्रीनिवास देशमुख, सुजीत भोसले, पो.ना. राहुल घाडगे, अविनाश चव्हाण, विक्रम माने, पो. कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, विशाल घुमाळ यांनी केली.