राजा उदार झाला अन हाती भोपळा आला, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या
दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘महाविकास
आघाडी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. पूरग्रस्तांना
फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला
अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत
बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘केंद्राच्या कृषी
कायद्याचे बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच आहे. तत्कालीन
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांचाच या कृषी कायद्यात
समावेश करण्यात आला आहे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस
पुढे म्हणाले की, ‘फक्त महाराष्ट्रातच खासगी एपीएमसी आहे. खासगी
एपीएमसीच्या माध्यमातूनच राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे. तरीही
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला जातोय. 2013 मध्ये तत्कालीन
पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी एक समिती
स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. या समितीचा अहवाल
स्वीकारण्यात आला. त्यात कृषी मार्केटिंगमध्ये बदल करण्याची आणि
शेतकऱ्यांना पर्यायी स्पर्धात्मक बाजारपेठ हवी अशी सूचना करण्यात आली आहे
आणि आज तेच लोक केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत आहेत. हा कायद्याला
विरोध नसून, राजकीय विरोध आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू’

मराठा
आरक्षणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आझाद मैदानात मराठा
समाजाचे आंदोलन सुरू आहे. आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयात दोन हिअरिंग
झाल्या. मात्र स्टे आला नाही. मात्र आता स्टे आला आहे. आमच्या काळात अनेक
आंदोलन झाली मात्र कोणाला अटक नाही झाली. आता तर अनेक मराठा तरुणांना घरीच
थांबवले जात आहे. त्यांना मुंबईत येऊ दिलं जात नाही. सरकार मधील मंत्री
सरकार विरोधात मोर्चा कसे काढू शकतात. त्यांनी शपथ घेतली आहे. त्या शपथेचा
भंग होत आहे. ओबीसींच्या आरक्षणात कोणाला वाटेकरी होता येणार नाही असा ठराव
मंत्रीमंडळ बैठकीत घ्या. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्तारूढ पक्ष
करत असेल तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!