स्थैर्य,दि ३०: सध्या शेअरबाजारात तेजीची स्थिती आहे, गुंतवणूकदारांची सकारात्मक मानसिकता, कर्जरोख्यातील घटणारा परतावा यामुळे वाट पाहात असणाऱ्या अनेक कंपन्या गुंतवणूदारांसाठी शेअर खरेदीची प्रारंभिक ऑफर घेऊन येत आहेत.
सगळ्यात पहिल्यांदा 2 डिसेंबरला बर्गर किंग इंडिया कंपनीचा आयपीओ येत आहे. त्याचा किंमतपट्टा 59-60 रुपये प्रतिशेअर असणार आहे. मात्र मागील आठवड्यात ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर 40 टक्के प्रीमियने वधारलेले होते, अशी बातमी मनीकंट्रोल या संकेतस्थळावर झळकली होती.
बर्गर किंग इंडिया ही अमेरिकेतील हॅम्बर्गर फास्ट फूड रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या रेस्टॉरंट ब्रॅंडस् इंटरनॅशनल या कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. या कंपनीची भारतात 259 रेस्टॉरंटस् आणि नऊ उपशाखांद्वारे चालवली जाणारी रेस्टॉरंटस् आहेत. त्यापैकी 249 रेस्टॉरंटस् सध्या कार्यरत आहेत.
बर्गर किंग इंडियाच्या पाठोपाठ सूर्योदय स्मॉल फायानान्स बॅंक, ईएएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंक, नजारा टेक्नॉलॉजीज, रॅटेल, अँटनी वेस्ट मॅनेजमेंट या कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत 12 कंपन्यांनी आयपीओद्वारे भांडवली बाजारातून 24,963 कोटी रुपये उभारले आहेत. 2019 मध्ये 16 कंपन्यांनी आयपीओद्वारे 12,363 कोटी रुपये उभारले होते.
चालू वर्षी रूट मोबाइल, हॅपिएस्ट माईंड टेक्नॉलॉजी, रोझरी बायोटेक, ग्लॅंड फार्मा, माझगाव डॉक या कंपन्यांच्या शेअरनी पदार्पणानंतर गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. डिसेंबरमधील सगळ्यात मोठा आयपीओ कल्याण ज्वेलर्सचा असणार आहे.
कंपनी आयपीओद्वारे 1750 कोटी रुपये उभारणार आहे. नजारा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मुंबईतील या मोबाइल गेमिंग कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला, वेस्टब्रिज व्हेंचर्स, टर्टल एन्टरटेन्मेंट यांची गुंतवणूक आहे.