स्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोर कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना आरोग्य व्यवस्था, युवकांचा रोजगार, सरकारने सुरू केलेले खासगीकरण, प्रजासत्ताक दिनाचा हिंसाचार आणि शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. डॉ. कोल्हे यांनी सात मिनिटे केलेल्या भाषणाची चर्चा होत आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारच्या विविध योजनांचा तळागाळातल्या लोकांना फायदा झाल्याचे सांगितले होते. त्यावर डॉ. अमोल कोल्हे सरकारचे अभिनंदन करत विविध मुद्द्यांवर सरकारवर टीकाही केली. कोरोना काळात ज्या देशाची आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली असेल त्या देशाची प्राथमिकता काय असायला हवी असा सवाल विचारला. सरकारची प्राथमिकता नवीन संसद भवन हवी की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज असे सार्वजनिक हॉस्पिटल असावे असा सवालही त्यांनी विचारला.
राज्याच्या जीएसटीच्या पैशाची करून दिली आठवण
महाराष्ट्र सरकारच्या हक्काचे, जीएसटीचे सुमारे 25 हजार कोटी रुपये केंद्राकडे बाकी आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
खासगीकरणावर केली टीका
डॉ. कोल्हे म्हणाले की, “या अभिभाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकले होते तेंव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर भांडवलदार निर्भर’ भारताची?”
शेतकरी आंदोलनावर भाष्य
शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा कट असल्याचे कोल्हे म्हणाले. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या 200 भारतीयांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याचं आश्चर्य डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.