पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । पुणे । पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे-फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक (प्रकल्प) सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक (नियोजन) व्ही. के. गोपाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी कोलते दांपत्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पुणे व नाशिक जिल्ह्यातील कृषिमाल वाहतूक, मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळत आहे असा संदेश आजच्या खरेदीखतातून जाणार आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

हवेली तालुक्यातील 12 गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 8 गावांची पूर्ण तर 2 गावांची अंशत: संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. झालेले खरेदीखत हे हवेली तालुक्यातील पेरणे गावातील असून प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यातील हे पहिले खरेदीखत आहे, अशी माहिती यावेळी श्रीमती आखाडे-फडतरे यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!