
सज्जनगड – श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात व्हायोलिन वादन करताना लालगुडी कृष्णन ,मृदुंगमवर साथ श्री गुरु राघवेंद्र यांनी अतिशय सुरेखपणे करून घट्टंमवर साथ करणार्या शिवराम कृष्णन यांनी उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद स्वीकारली. (अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 3 जानेवारी, सातारा :श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सज्जनगड येथील दास नवमी संगीत महोत्सवांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक लालगुडी कृष्णन यांनी अतिशय बहारदार अशी व्हायोलिन वर विविध रागाची बरसात करत उपस्थित रसिक समर्थ भक्तांना मंत्रमुग्ध केले.
दासनवमीसंगीत महोत्सवाचा प्रारंभ व्हायोलिन वादन करताना आपल्या कार्यक्रमात ..राम राम .. व्हायोलिन वर सादर करून लालगुडी कृष्णन यांनी जोनपुरी रागातील.. रामनि राम मंत्र वे.. हा पुरंदर दास या कर्नाटकातील संतांनी रचलेल्या अभंगाचे सुरेख सादरीकरण करून भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या ..प्रेम मुदीत मनसे कहो, राम राम.. या सुप्रसिद्ध भजनाचे सादरीकरण व्हायोलिन वर करून त्यानंतर करह प्रिय रागातील संत त्यागराजांची रचना असलेली ..राम सादर करून त्यानंतर समाज वर्गमना आणि मालकंस , हिंदोलम रागातील ही बंदिश सादर करताना आपल्या साधनेची ताकद उपस्थित त्यांना करून दिली .आणखीन एक अमृतवाहिनी रागातील धेनुका रागातील.. राम पदम ..सादर करून अमृतवाहिनी रागातील ..रा रा राजीवलोचना.. हे मैसूर येथील वासुदेव यांची रचना असलेली भूप रागातील बंदिश सादर केली. कानडी भाषेतील कृष्णा नी बेगने ही व्यास राजांची रचना यमन रागात सुरेखपणे सादर करून समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ..आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. या रचनेच्या सादरीकरणाने तब्बल पावणे दोन तास रंगलेल्या या वाद्यांच्या जुगलबंदीची सांगता केली.
यावेळी लालगुडी कृष्णन यांना मृदुंगमवर साथ श्री गुरु राघवेंद्र यांनी अतिशय सुरेखपणे करून दक्षिणात्य पद्धतीच्या माठावर अर्थात घट्टंमवर साथ करणार्या शिवराम कृष्णन यांनी उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद स्वीकारली .व्हायोलिनचे सादरीकरण होतानाच मध्यंतरात घट्टम आणि मृदुंगमची झालेली जुगलबंदी अनेक समर्थ भक्तांना ही प्रचंड भावली.टाळ्यांच्या गजरात या सर्व कलाकारांचे स्वागत या सर्वांनी केले .
कार्यक्रमाची सांगता समर्थ सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉ.अजित कुलकर्णी यांच्या हस्ते या सर्व कलाकारांना रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन करण्यात आला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान , सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या दासनवमी उत्सव कार्यक्रमांतर्गत बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत माजलगाव ,बीड येथील ह.भ.प.लक्ष्मीप्रसाद पटवारी -कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार असून सायंकाळी साडेसहा वाजता अभयसिंह वाघचौरे यांचे उपशास्त्रीय गायन व अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यांना तबलासाथ राघव नरेवाडीकर करणार असून हार्मोनियमची साथ स्वानंद राजोपाध्ये करणार आहेत.

