आज उघडणार मंदिरांचे द्वार, पाळा नियमांचा शिष्टाचार; साई मंदिरात ऑनलाइन, महालक्ष्मी मंदिरात रोज 3 हजार जणांना दर्शन


 

स्थैर्य, दि.१६: पाडव्याच्या मुहूर्तावर
राज्यातील मंदिर, मशीद, चर्च, बुद्धविहार यासह सर्वच धार्मिक स्थळे
उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात ऑनलाइन पास
काढूनच दर्शनासाठी जावे लागणार आहे, तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात
राेज तीन हजार जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. शासनाचे कोविडसंदर्भात
नियम पाळूनच मंदिर आणि धार्मिक स्थळामध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे
धर्मगुरूंनी सांगितले. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरसह सांगली, सातारा, नागपूर
येथील धार्मिक स्थळेही उघडण्यात येणार आहेत.

शिर्डी: साई मंदिरात ६ हजार भाविकांना रोज दर्शन, मात्र अॉनलाइन पास आवश्यक
साई
मंदिरात सोमवारपासून (दि.१६) दिवसभरात केवळ सहा हजार भाविकांना दर्शन
मिळेल. त्यातील तीन हजार जणांना ऑनलाईन, दोन हजार जणांना शिर्डीत ऑफलाइन
पास आणि एक हजार ग्रामस्थांना दररोज सकाळी पावणे सहा ते पावणे सातच्या
दरम्यान दर्शन घेता येईल. अॉनलाइन दर्शन पास किंवा संस्थानमध्ये
बायोमेट्रिकच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करून दिलेल्या वेळतच दर्शन मिळेल,
अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.फिजिकल डिस्टन्सिंगसाठी
रविवारी दर्शन रांगेत मार्किंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अशी असेल व्यवस्था
– दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग व हातपाय धुण्याची व्यवस्था.
– भाविकाला ताप असल्यास त्यास तातडीने संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था.
– रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधून किमान पन्नास जणांच्या तब्येतीविषयी फीडबॅक संस्थान आठवडाभराने घेणार.
– ६५ वर्षांपुढील भाविकांना दर्शनासाठी अनुमती नाही.
– समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मात्र चावडी आणि मारुती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल.
– सत्यनारायण, अभिषेक, पूजा, ध्यान मंदिर, पारायण कक्ष बंद राहील.
– भाविकांना फक्त उदी देण्यात येईल.
– भक्त निवासात रोज एकासाठी एक खोली उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

आळंदी : अशी असेल दर्शनव्यवस्था
श्रीक्षेत्र
आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर सोमवार, १६
नोव्हेंबरपासून माउलीभक्तांसाठी खुले होत असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर
महाराज संस्थान कमिटीच्या वतीने रविवारी देण्यात आली. दर्शनासंदर्भात
शासनाने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच मंदिर व्यवस्थापनाने तयार
केलेली दर्शनव्यवस्था यांची माहिती करून घेऊन भाविकांनी शिस्त पाळून दर्शन
घ्यावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

दर्शनबारीतून
प्रवेशणाऱ्या भाविकांना शक्य तितक्या जवळून माउलींचे दर्शन मिळावे या
हेतूने पंखामंडपातून दर्शन घेऊन पाणदरवाजातून बाहेर पडावे अशी व्यवस्था
करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री आठ या वेळात मंदिर दर्शनासाठी खुले
राहील, मात्र दर २ तासांनी सॅनिटायझेशन होईल.

सकाळी सहा ते ९ भाविकांचे दर्शन
नऊ ते साडेनऊ स्वच्छतेसाठी दर्शन स्थगित
साडेनऊ ते बारा दर्शनबारी खुली
१२ ते १ गाभारा स्वच्छता व नैवेद्य
एक ते ३ भाविकांचे दर्शन
३ ते साडेतीन स्वच्छता व सॅनिटायझेशन
३.३० ते साडेपाच दर्शनबारी सुरू
५.३० ते ६ स्वच्छता
सहा ते आठ दर्शनबारी सुरू

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरात ३ हजार प्रवेश
राज्य
शासनाने दिवाळी पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरू
करण्याबाबत कार्यपद्धती जाहीर केली आहे. या निर्णयाचे पश्चिम महाराष्ट्र
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत केले आहे. पण महालक्ष्मी
मंदिरात प्रवेश करताना भाविकांना नियम पाळूनच प्रवेश दिला जाईल, असे
सांगितले. तसेच रोज केवळ २ ते ३ हजार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार
आहे.
सात महिने अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
नवरात्रोत्सवातसुद्धा भाविकांना दर्शन घेता आले नाही. दिवाळीनिमित्त
सर्वांनाच सुटी आहे. अशातच मंदिर उघडण्याबाबत निर्णय झाला असल्याने गर्दीवर
नियंत्रण ठेवणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसमोर मोठे आव्हान बनले
आहे. सुटीच्या हंगामात रोज लाखभर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
मात्र, कोरोनामुळे आता मंदिर प्रशासनाने शासनाच्या नियमांचे पालन करून
भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचे निश्चित केले आहे.

भाविकांची
दरवाजावरच तपासणी केली जाणार असून त्यानंतरच आत प्रवेश मिळणार आहे.
सॅनिटायझेशन करून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दोन
भक्तांमध्ये किमान २ फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे.

सांगली : मीरासाहेब दर्ग्यात सर्वांना प्रवेश
सांगलीतील
गणपती मंदिर आणि मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यात सर्वांना प्रवेश खुला होणार
असल्याने भक्तांंमधून समाधान व्यक्त होत आहे. सुमारे साडेसातशेवर गावांमधील
मंदिर, मशिदी तसेच अन्य धार्मिक स्थळे शासन निर्णयामुळे बंद झाली.
होळीपासून बहुतेक सणावेळीही मंदिरे बंद राहिली. ग्रामीण भागातही
प्रारंभीच्या काळात कडेकोटपणे बंदी पाळण्यात आली. नंतर हळूहळू ग्रामस्थांनी
त्यात ढिलाई दिली. शहरी भागात मात्र बंदीचा काटेकोर पालन झाले. तासगाव,
कडेगाव येथील उत्सव बंद राहीले. आता पाडव्यालाच मंदिरे उघडण्यात आल्याचे
दिवाळीच्या नवपर्वताची सुरवात चांगली झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेखही
आता घटला असल्याने धार्मिक स्थळे सुरु रहावीत यासाठी आग्रह वाढत होता.

कळवण : सप्तशृंगीवर तासाला ३४४ जणांना दर्शन
सप्तशृंगीदेवी
गडावर प्रतितासाला ३४४ भाविकांना दर्शन देण्याची प्राथमिक व्यवस्था
करण्यात आली आहे. मंदिर पहाटे पाच ते रात्री ९ पर्यंत खुले राहणार आहे.
मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर बंधनकारक असून फिजिकल डिस्टन्सिंगसाठी
चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करण्यात आली आहे. मंदिर मार्गावर
विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर स्टँड व ट्रस्ट तसेच
ट्रॉलीच्या परिसरात प्रत्येकी चार ठिकाणी हात धुण्याची सुविधा करण्यात आली.
फेनिक्युलर ट्रॉलीने प्रतितासाला १२० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल.
एकाच वेळी गर्दी करू नये. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सूचनांचे योग्य पालन
करत संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक भाविकाने स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे,
असे आवाहन संस्थेने केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर

तुळजापूर | मंदिर रविवारी सॅनिटाइझ करण्यात आले. रोज ४ हजार भाविकांना
पहाटे पाच ते रात्री ९ पर्यंत प्रवेश दिला जाईल. यासाठी प्रवेश पास
बंधनकारक. मास्क, फिजिकल डिस्टन्स अनिवार्य. वृद्ध, लहान बालकांना प्रवेश
दिला जाणार नाही.
– पंढरपूर | सकाळी सहापासून दहा तास मुखदर्शन. ऑनलाइन (www.vitthalrukminimandir.org) नोंदणी गरजेची.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!