स्थैर्य, दि.१३: टीआरपी घोटाळा प्रकरणात
रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रिपब्लिक टीव्हीशी संबंधित
असलेली ही दुसरी अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी
यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई
करण्यात आली.
टीआरपी
घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
रिपब्लिकसंबंधित ही दुसरी अटक आहे. या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या
13 वर पोहोचली आहे. या प्रकरणात थेट सहभाग दिसून आला असल्याने रिपब्लिक
टीव्हीच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई
पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघड केला होता. बॅरोमिटरमध्ये
फेरफार करून टीआरपी आकडे वाढवण्यात येत होते. याबाबत मुंबई पोलिसांनी
कारवाई करून काहींना अटकेत घेतले होते. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी
रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपले चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचे
समोर आले होते.
दरम्यान
आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यामध्ये 46 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. 13
आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी
अर्ज केला आहे. दरम्यान महामूव्ही वाहिनीचे मार्केटिंग प्रमुख अमित दवे,
सीईओ संजीव वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता.