
स्थैर्य, फलटण दि.१४ : महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्याने त्याबाबत महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाची भावना आपण व्यक्त केली होती, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता नाही, तथापी आपल्या वक्तव्याने खळबळ माजली, त्यानंतर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत घेतलेला निर्णय कदाचित योगायोग असेल पण योग्य असून आपण सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना सरकार मंदिरे खुली करण्यास परवानगी देत नाही, भाविकांच्या भावनांशी खेळले जात आहे, याचा निषेध म्हणून आज (शनिवारी) युवकमित्र ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर व व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी न करता व्यसनमुक्त युवक संघ मध्यवर्ती कार्यालय, पिंप्रद येथे प्रतिकात्मक पिंडदान केले.
दरवर्षी व्यसनमुक्त युवक संघातर्फे नरक चतुर्दशी दिवशी सर्व पदाधिकारी/कार्यकर्ते एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करीत असतात. यावर्षीही सर्वजण एकत्र आले मात्र अभ्यंगस्नान न करता थंड पाण्याने आंघोळी केल्या, प्रमुख कार्यकर्त्यांनी क्षौर मुंडन, पिंडदान केले व निषेध म्हणून मिष्ठान्न न खाता बाजरीची भाकरी व आमटी असे जेवण केले. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रांताध्यक्ष शहाजी काळे, उपाध्यक्ष प्रा. मारुती शेळके, सचिव विवेक राऊत, मार्गदर्शक विलासबाबा जवळ, प्रा. डॉ. नारायण गवळी यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.