छटपूजेला परवानगी द्या; भाजपची पालिकेकडे मागणी


 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: दिवाळीनंतर लगेचच २० व
२१ नोव्हेंबरला येणा-या छटपूजा कार्यक्रमासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर
मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून नियम व अटींच्या अधीन राहून छटपूजेसाठी
परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पालिकेचे
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे
सदर मागणी करण्यात आली.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर उत्तर
भारतीय नागरिक वास्तव्य करतात. उत्तर भारतात दिवाळीनंतर लगेचच छटपूजा या
धार्मिक विधीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गेली कित्येक वर्षे
मुंबई शहरातसुद्धा छटपूजेचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. दरवर्षी या
कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका आवश्यक परवानगी देत असते. मात्र या वर्षी
कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अद्याप कोणताही ठोस
निर्णय घेतलेला नाही. साधारणत: आजमितीस १०० लोकांपर्यंत कार्यक्रमास
महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.

छटपूजेसाठी छोटासा कृत्रिम तलाव / हौद
महापालिकेच्या अखत्यारीतील जागेवर उभारून त्यावर एका वेळी १००पेक्षा कमी
लोकांना कोविड खबरदारीचे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सामाजिक अंतराचे
ध्यान ठेवून छटपूजा करण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक
तत्त्वे तयार करावीत व तत्संबंधीचे आदेश विभागीय सहायक आयुक्तांना द्यावेत,
अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आमदार मिहिर कोटेचा, भाजप उत्तर
भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, छटपूजा आयोजक अमरजित
मिश्रा, बृहन्मुंबई महानगरपालिका पक्षनेते विनोद मिश्रा, भाजप प्रवक्ते
भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश
काकाणी यांनी छटपूजेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे दोन दिवसात निश्चित
करण्याचे व तशा सूचना सर्व विभागीय सहायक आयुक्तांना देण्याचे आश्वासन
दिले, अशी माहिती भालचंद्र शिरसाट यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!