स्थैर्य, फलटण दि. ३० : राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत यांनी स्वदेशी बचाव व आजादी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून सुरु केलेले कार्य आजही अविरत सुरु आहे. आज देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद या नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करीत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
आसू ता. फलटण येथे सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत यांची जयंती व पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साधे पद्धतीने साजरी करण्यात आली.यावेळी अरविंद मेहता बोलत होते. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे, ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख श्रीरंग पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रबंधू राजीव दिक्षीत यांनी सेटेलाईट टेलकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले होते, त्याच बरोबर ते उच्च विद्याविभूषित होते. भोपाळ वायू दुर्घटनेतील नरसंहारामुळे बहुराष्ट्रीय कंपन्याविरुध्द आजादी बचाव आंदोलन त्यांनी सुरु केले. भारत देशावर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १५० वर्षे राज्य केले. आज ५ हजाराच्यावर बहुराष्ट्रीय कंपन्या भारत देशात व्यापार करुन देशाची लुट करीत आहेत. भारतीय स्वातंत्र्याला पूर्वीपेक्षाही आज स्वदेशीची खरी गरज असल्याचे राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत नेहमी सांगत असल्याची आठवण अरविंद मेहता यांनी यावेळी करुन दिली.
राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांनी देशातील जनतेला दिलेले विचार खूप प्रेरणादायी असून आज देशभर राजीववाद या नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करीत असल्याचे प्रकाश सकुंडे यांनी सांगितले.
स्वर्गीय राजीवजी दीक्षित हे सन १९९३ साली आसू ता. फलटण येथे स्वदेशी बचाव, देश बचाव जनजागृती करण्यासाठी आले असता आसू येथे राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले असल्याचे नाना जाधव यांनी निदर्शनास आणून देत त्याच वृक्षाच्या सावलीत आजचा कार्यक्रम होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
प्रारंभी राष्ट्रबंधू स्व. राजीवजी दीक्षित यांच्या प्रतिमेचे पूजन त्यानंतर राजीवजी दीक्षित यांनी लावलेल्या झाडाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रकाश सकुंडे, नाना जाधव, शंकर गायकवाड, प्रविण सकुंडे, अजय गोळे, आकाश सकुंडे, फाळके, रोहन गायकवाड, साहिल सकुंडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.