जुनून सामाजिक संस्थेच्या मुलांनी लुटला ख्रिसमसचा आनंद


स्थैर्य, मुंबई, दि.२५ : कांदिवलीस्थित ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये यंदाचा ख्रिसमस (नाताळ) नेहमीपेक्षा विशेष ठरला. कारण जुनून या सामाजिक संस्थेच्या मदतीने मॉलमध्ये एकूण ३० गरजू मुलांसाठी ख्रिसमसनिमित्त विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॉल व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमधून मुलांना मजा, मस्ती करत त्यांच्या आवडत्या सँटासोबत ख्रिसमस साजरा करता आला.

ख्रिसमसच्या आठवड्यात जगभरात सँटाक्लॉज लोकांमध्ये आनंद वाटत विश्वास निर्माण करण्याचे काम करताना आपण पाहिलेच असेल. हाच उद्देश मनाशी बाळगून कांदिवलीतील ग्रोवेल्स १०१ मॉल व्यवस्थापनाने यंदा जुनून या सामाजिक संस्थेच्या मदतीने ३० वंचित व गरजू मुलांसाठी ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबर २०२० रोजी विशेष पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी विविध कार्यक्रम राबवताना सोशल डिस्टसिंग राखत सुरक्षेच्या सर्व खबरदारी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात आल्या होत्या.

ग्रोवेल्स १०१ मॉल व्यवस्थापनाने मॉलमध्ये नॉर्थ पोलमधील व्हाईट ख्रिसमसची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. मॉलच्या मध्यवर्ती भागात दैदिप्यमान असे ख्रिसमस ट्रीने आच्छादलेले हिमनगाचे उंचच उंच डोंगरचे डेकोरेशन उभारण्यात आले आहे. याच ठिकाणाहून  पोलर एक्सप्रेस ही टॉय ट्रेन बच्चे कंपनीला मॉलची आल्हाददायक सफर घडवते. याशिवाय याठिकाणी मजेशीर फोटो काढण्यासाठी ‘बूमरंग हट’ (लाकडी झोपडी) हे फन स्टेशन उभारण्यात आले आहे. तसेच सँटाक्लॉजला पत्र पाठवण्यासाठी टपाल पेटी, चॉकलेट आणि गिफ्ट्सने भरलेली ‘सँटा हट’ अशी लक्ष वेधून घेणारी आकर्षण मॉलमध्ये ठेवण्यात आली आहेत.

यानिमित्ताने आयोजित जादूचे प्रयोग आणि स्टिल्ट वॉल्कर्सच्या सादरीकरणाने मुलांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. गिफ्ट्सने भरलेले गाठोडे घेऊन ज्यावेळी प्रत्यक्षात सँटा याठिकाणी अवतरला, त्यावेळी मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या सँटाने येथील प्रत्येक मुलासोबत संवाद साधताना त्यास भेटवस्तूही दिली. त्यानंतर मॉलच्या फूड कोर्टमध्ये बच्चे कंपनीसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली होती. तिथे आरामशीर बसून मुलांनी अल्पोपहारावर ताव मारला.

ग्रोअर अँड वेल (इंडिया) लिमिटेडमधील रीटेल अँड रीअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आणि ग्रोवेल्स १०१ मॉलचे चालक सचिन धनावडे म्हणाले की, जुनून सारख्या सामाजिक संस्थेने मॉलचे निमंत्रण स्विकारून अनाथ मुलांच्या आयुष्यात थोडी मजा-मस्ती भरण्यासाठी संधी दिल्याचा आम्हाला आनंदच आहे. ग्रोवेल्स १०१ मॉल ज्या ठिकाणी आहे, तेथील परिसर आणि समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी मॉल व्यवस्थापन बांधिल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांमध्येही मॉल व्यवस्थापन आघाडीवर आहे.


Back to top button
Don`t copy text!