‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ यांच्याकडून पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला युनिट प्रशस्तीपत्र प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | पुणे |
पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) आज आयोजित समारंभात ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, एसएम व्हीएसएम यांच्या हस्ते देशातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला युनिट प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

१ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत दाखवलेल्या असामान्य वचनबद्धतेसाठी आणि दिलेल्या अनुकरणीय सेवांसाठी हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. एएफएमसीचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम आणि सुभेदार मेजर आरके सिंह यांनी सीडीएसकडून प्रशस्तीपत्र स्वीकारले.

यावेळी सशस्त्र दलात सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त मान्यवर उपस्थित होते. आशियातील कोणत्याही देशाच्या सशस्त्र दलाने स्थापन केलेल्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या आणि देशातील पहिल्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सातत्याने स्थान पटकावलेल्या एएफएमसीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे ३.४५ च्या सीजीपीएसह अ+ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रिसिजन मेडिसिन आणि टेलीमेडिसिन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक अध्यापन शिक्षण पद्धतींचा वापर करून, एएफएमसी वैद्यकीय प्रगतीत आघाडीवर आहे, आरोग्य उपचार पद्धतींचा विस्तार करण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक वैद्यकीय नवोन्मेषांमध्ये योगदान देण्यासाठी तंत्रज्ञान अवलंबत आहे.

सशस्त्र दल आणि राष्ट्राच्या आरोग्य उपचार सेवा गरजा पूर्ण करण्यात या वैद्यकीय महाविद्यालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली सेवेसाठी, एएफएमसीला १ डिसेंबर २०२३ रोजी प्रेसिडेंट्स कलर सन्मानाने गौरवण्यात आले.

महाविद्यालयाद्वारे दिल्या जाणार्‍या असाधारण बाह्यरुग्ण आणि रुग्णालयातील आरोग्य उपचार सेवांचा वार्षिक १.५ लाखांहून अधिक रुग्ण लाभ घेतात. एएफएमसीद्वारे दत्तक घेतलेल्या कासुर्डी गावात हाती घेतलेले आउटरीच उपक्रम हे समाजाला दर्जेदार, प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, निदान आणि उपचारात्मक आरोग्य सेवा देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेची साक्ष आहेत.

समाजाप्रति असलेली ही बांधिलकी अधिक दृढ करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येसाठी एएफएमसीद्वारे सिकलसेल तपासणी प्रकल्पही हाती घेतला जात आहे. कॉम्प्युटेशनल औषध केंद्र, टेली-मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अ‍ॅक्रॉस स्टेट (टेली-मानस) कक्ष आणि एएफएमसी येथे नुकतेच सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक औषध विभागाने आरोग्य सेवा शिक्षण, संशोधन आणि सेवा वितरणासाठी एक नवीन आणि समग्र आयाम जोडला आहे.

यावेळी बोलताना ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ यांनी जनरल नरेंद्र कोतवाल आणि एएफएमसी बिरादरीचे त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल आणि सशस्त्र दलातील योगदानाबद्दल अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!