दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे सातारा जिल्ह्यातील २०२३-२४ च्या तीन आदर्श शिक्षण संस्था व राज्य शासनाच्या संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात पुरस्कार प्राप्त सातारा जिल्ह्यातील तीन शाळा व प्रत्येक तालुक्यातील तीन शाळांचा गौरव वितरण सोहळा तळदेव, महाबळेश्वर या ठिकाणी पार पडला. यामध्ये फलटणच्या कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेने फलटण तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला आहे.
रविवार, दि. १७ मार्च रोजी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव, ता. महाबळेश्वर येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात विजय नवल पाटील (माजी केंद्रीय मंत्री, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था, महामंडळ पुणे), आमदार विजय गव्हाणे व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे तसेच विजयराव कोलते, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ पुणे व श्री. अशोकराव थोरात, अध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ सातारा, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांच्या वतीने सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, व प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचे प्राचार्य व शिक्षक यांना तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढ व विकास होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ‘माझी शाळा -सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्यात आले. सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक शाळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल या शाळेने राबवलेले, स्वच्छता, साक्षरता, पर्यावरण विषयक उपक्रम, गुणवत्ता संवर्धनाचे उपक्रम तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग नोंदवलेले उपक्रम, विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, समृद्ध ग्रंथालय व प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, विविध परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणार्या उपक्रमांची नोंद या अभियानात घेण्यात आली.
शालेय गुणवत्तेची परंपरा कायम राखणार्या शाळेने तालुका स्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप माने, सचिव श्री. विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, कोषाध्यक्षा सौ. सविता माने व इतर पदाधिकारी यांनी प्राचार्य श्री. अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम, योगिता सस्ते तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले.