स्थैर्य, वडगाव मावळ, दि.२२: वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. सर्वच्या सर्व सहाही विषय समित्यांच्या सभापतिपदावर आघाडीचे नगरसेवक विजयी झाले. तीन समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली, तर तीन समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सात नगरसेवक असलेल्या भाजपला एकही सभापतिपद मिळाले नाही.
नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे आदींच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी पूजा विशाल वहिले व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी पूनम खंडेराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती सभापतीच्या निवडणुकीत आघाडीचे नगरसेवक राहुल ढोरे यांनी भाजपचे दशरथ केंगले यांचा एकामताने पराभव केला. नियोजन व विकास समिती सभापतिपदाच्या निवडीत आघाडीचे राजेंद्र कुडे यांनी भाजपचे किरण म्हाळसकर यांचा एका मताने तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदाच्या निवडीत आघाडीच्या नगरसेविका माया अमर चव्हाण यांनी प्रवीण चव्हाण यांचा एका मताने पराभव केला. आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी तीन तर भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी दोन मते मिळाली. नगराध्यक्ष मयूर ढोरे हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. या समितीची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली व सर्व नवनिर्वाचित सभापतींना या समितीत स्थान मिळाले. निवडीनंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.