दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील मंडईत भाजीपाला विकणारे, अत्यंत कष्टाळू व सामान्य कुटुंबात राहणारे देवराज शेंडे व त्यांच्या पत्नी संगीता देवराज शेंडे यांनी फलटण ते अमरनाथ, केदारनाथ तसेच उत्तर भारतातील इतर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची दोघांनीही सायकल प्रवास करून यात्रा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे देवराज शेंडे हे अशिक्षित असूनही त्यांनी हे दिव्य पार केले आहे. देवराज शेंडे यांच्या पत्नी संगीता यांनीही अमरनाथ यात्रेसाठी सायकल शिकून पतीबरोबर स्वत: सायकल चालवून हा प्रवास केला आहे. त्यांचा हा भीम पराक्रम फलटणमध्ये कौतुकाचा विषय ठरला असून फलटणमधील गणेश मंडळाने त्यांचा भव्य सत्कार केला आहे.
सत्कारावेळी बोलताना देवराज शेंडे यांनी सांगितले की, माझे २० वर्षांपासून अमरनाथ यात्रा करण्याचे स्वप्न होते. आमचा प्रवास फलटणहून सुरू झाला. आमच्याजवळ स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य स्टोव्ह इ. आम्ही सायकलवर बांधून घेऊन गेलो होतो. दोघेही न थकता सायकल चालवित होतो. पेट्रोल पंपावर झोपणे, मंदिरात झोपणे तसेच इतर ठिकाणी जिथे राहण्याची सुविधा असेल अशा ठिकाणी झोपून हा प्रवास केला. दिवसभर सायकल चालवित असे व रात्री आराम. सलग दोन दोन दिवस सायकल चालविली आहे.
फलटणहून निघून प्रथम जेजुरीला खंडेरायाचे दर्शन घेतले, नंतर मुंबईला पोहोचलो. मुंबादेवीचे दर्शन घेऊन गुजरात, पुष्कर, जालिंदर शहर करून अमरनाथला पोहोचलो. अमरनाथ केल्यानंतर वैष्णोदेवी, नैनादेवी, ज्वालादेवी, कांगडादेवी, बाबा बालकनाथ करून हरिद्वारला पोहोचलो. त्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री केले. नीळकंठ करून उज्जैनला महाकालेश्वरला आलो. मथुरा, द्वारका, काशी केले, अयोध्या मात्र रस्ता चुकल्यामुळे केली नाही. त्यानंतर शिर्डी करून फलटणला पोहोचलो, असा प्रवास केल्याचे शेंडे यांनी सांगितले.
माणसाने जिद्द ठेवली तर तो काहीही करू शकतो, हे शेंडे दाम्पत्याने दाखवून दिले आहे. देवराज शेंडे व संगीता शेंडे या दाम्पत्याचा आदर्श फलटणकरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.