दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मल्लखांबपटू तसेच महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’प्राप्त श्री. विश्वतेज मोहिते आणि राष्ट्रीय मल्लखांबपटू तसेच ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त असणार्या सौ. माया विश्वतेज मोहिते हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते. या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे विविध पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अरविंदभाई मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुधोजी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरूवात फलटणचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम पी. एच. यांनी अतिथींचा परिचय करून दिला आणि महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणार्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आणि मुधोजी महाविद्यालयाचे वतीने यथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री. विश्वतेज मोहिते यांनी मल्लखांब या पारंपरिक खेळाला राष्ट्रीय महत्त्व कशा पद्धतीने प्राप्त झाले आणि आजच्या क्रीडा क्षेत्रातील मल्लखांब या खेळाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर सौ. माया विश्वतेज मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘खेळ आपल्या आयुष्यातील खरा दागिना आहे. त्यानेच माणसाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता यांनी फलटण संस्थान हे सुरूवातीपासूनच कला, क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देत आले असून आजही श्रीमंत संजीवराजेंच्या माध्यमातून फलटणनगरी क्रीडाक्षेत्रात अग्रगण्य असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वप्नील पाटील यांनी ही माहिती उद्घोषित केली. तसेच महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यासाठी कला शाखेतील प्रा. डॉ. अनिल टिके यांनी या अहवालाचे वाचन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विविध पारितोषिकांचे माहिती प्रा. तायाप्पा शेडगे यांनी दिली.
महाविद्यालयात विविध कलागुण सादर करून विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणार्या कलाविष्कार विभागातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी ही पारितोषिकाचे वाचन केले. विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि स्टाफ यांनी ही विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘बेस्ट टीचर’ म्हणून प्रो. डॉ. धवडे सर आणि प्रा. कुलकर्णी सर यांचा, तर बेस्ट डीपार्टमेंट म्हणून तत्वज्ञान विभाग आणि भूगोल विभाग यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय कार्यालयातील गुणवंत कर्मचारी म्हणून श्री. संदिप टिळेकर गुणवंत सेवक म्हणून सौ. सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर आणि प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे यांनी केले. डॉ. ए. एन. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.