धुळे येथे खून करून फरार झालेल्या आरोपीस निंबळकच्या ग्राम सुरक्षा दलाने पकडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
शिंदेवाडी, ता.जि. धुळे येथील आदर्श प्रल्हाद पिसाळ याचा दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी खून करून फरार झालेला आरोपी रोहिदास दादासो जाधव (राहणार निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा) हा निंबळक येथे आला असताना दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी निंबळकच्या ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील यांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, धुळे तालुका पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गु. र.न ८७/२०२३ भा. द. वि ३०२ मधील आरोपी रोहिदास दादासो जाधव (राहणार निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा) हा दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रमणपुरा शिवार, ता.जि धुळे येथे आदर्श प्रल्हाद पिसाळ (राहणार शिंदेवाडी, तालुका धुळे, जिल्हा धुळे) याचा खून करून फरार झाला होता. सदर आरोपीबाबत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती दिली असता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे रोहिदास जाधव या आरोपीच्या मागावर होते.

दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ६.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहिदास दादासो जाधव हा निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचण्याच्या अगोदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती बातमीदाराकडून समजल्यांतर गावातील ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील प्रमोद ज्ञानदेव बनकर यांना त्या आरोपीला ताब्यात घेण्याकरिता सांगितले. त्यानंतर तात्काळ पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाने आरोपी रोहिदास दादासो जाधव (राहणार निंबळक, तालुका फलटण) यास ताब्यात घेतले घेतले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तेथे पोहोचून सदर आरोपीस पकडले व स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहा.पो.नि.नितीन शिंदे, पो. उपनिरीक्षक सागर अरगडे, पो.हवा. अमोल कर्णे, अडसूळ, पो. ना. अभिजीत काशीद, पो.ना. अमोल जगदाळे, योगेश रणपिसे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!