दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
जनमानसात परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावी, निर्माण झालेली आवड वृध्दींगत व्हावी, दुःखविरहित अशा आनंदाच्या राशीवर स्थिर व्हाव्यात, संतसंगती, ग्रंथवाचन, श्रवण व नामचिंतन घडावे, या हेतूने प. पू. गुरुवर्य वै. ह. भ. प. काळे महाराज (कन्हेरी) व प. पू. गुरुवर्य वै. ह. भ. प. गायकवाड महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व ह. भ. प. नामदेव महाराज ननवरे (मा. अध्यक्ष, फलटण तालुका वारकरी संघटना), ह. भ. प. बंकट महाराज ढवळे व ह. भ. प. प्रल्हाद महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष ३० वे याचे आयोजन सोनगाव बंगला (ता. फलटण) येथील ननावरे बंधू यांच्या माऊली शेती फार्म या ठिकाणी उत्साहात करण्यात आले होते.
या सप्ताहामध्ये विविध नामांकित कीर्तनकारांची सेवा घडली. त्यामध्ये ह. भ. प. पांडुरंग महाराज सोडमिसे सोमंथळी, ता. फलटण, ह. भ. प. बाजीराव महाराज रणसिंग गिरवी, ता. फलटण, ह. भ. प. सुनील महाराज यादव निरखे, ता. फलटण, ह. भ. प. प्रवीण महाराज चव्हाण विठ्ठलवाडी, ता. बारामती व ह. भ. प. हणमंत महाराज रणवरे निंभोरे, ता. फलटण यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम सप्ताहाचा आरंभ गुरुवार, दि.२८/११/२०२४ रोजी झाला व तसेच समारोप सोमवार, २/१२ /२०२४ रोजी झाला. यावेळी पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्त, तरुण मंडळ व ग्रामस्थ मनोभावे सहभागी झाले होते. माऊली फार्मपासून दिंडी सुरुवात होऊन ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर, हनुमान मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिर भेट घेऊन परत सप्ताह ठिकाणी पोहचली.
सिद्धनाथ मंदिर परिसरात या दिंडीचे स्वागत सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ यांचेकडून जल्लोषात करण्यात आले. यामध्ये गावातील बहुसंख्य पती-पत्नी जोडप्यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत व पूजन करून हा सोहळा अविस्मरणीय करण्यात आला. जोडप्यांनी शिस्त राखत दिंडी सोहळ्याचे पूजन केले.
वारकरी संप्रदाय व गावातील सर्व तरुण मंडळ एकत्र आल्याने सर्व परिसर भक्तीमय झाला. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व जोडप्यांनी व वारकरी मंडळींनी कीर्तन, भजनांचा जयघोष करत फुगडी खेळून आनंद साजरा केला. गावातील प्रमुख रस्ते स्वच्छ, सुशोभित करण्यात आले होते. सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून स्वागत केले.
सर्व तरुण मंडळ सोनगाव, विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, चैतन्य राम जप संकुल सोनगाव व ग्रामस्थ यांनी दिंडी सोहळ्याचे संयोजन केले होते.